केळघर घाटात दुचाकी दरीत कोसळली; दोघे बेपत्ता!

केळघर : सातारा – महाबळेश्वर रस्त्यावर केळघर घाटात रविवारी सायंकाळी भरधाव वेगात असलेली दुचाकी घाटातून दरीत कोसळली. अपघातानंतर राबवलेल्या शोधकार्यात दुचाकी आढळून आली आहे. मात्र, दुचाकीवरील दोघे बेपत्ता असून यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स.पो.नि. सुधीर पाटील फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.

स्वाती अमोल मोहिते व विक्रम युवराज मोहिते (रा. साप, ता. कोरेगाव) अशी दरीत बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, स्वाती व विक्रम हे दोघे साप येथून महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेले होते. म’श्वरमध्ये फिरून झाल्यानंतर ते पुन्हा गावी निघाले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास केळघर घाटातील मुकवली (माची)जवळ त्यांची दुचाकी आली असता दुचाकीचा ताबा सुटला व दुचाकी थेट 200 फूट खोल दरीत कोसळली. ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी लगेच मेढयाचे सपोनि सुधीर पाटील यांना याची कल्पना दिली. यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण करण्यात आले.यानंतर ट्रेकर्सचे जवान व पोलिसांनी शोधकार्यास सुरूवात केली. यामध्ये दुचाकी व मोबाईल आढळून आला. पोलिसांनी मोबाईलवरून नातेवाईकांना फोन करून या अपघाताची माहिती दिली. अंधार पडू लागल्याने ही शोधमोहिम थांबवण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button