
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू संदीप जोशी यांना विधानपरिषदेची उमेदवारी!
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांना भाजपाने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. महायुतीचे संख्याबळ लक्षात घेता जोशी यांची विधान परिषदेवरील नियुक्ती निश्चित मानली जाते.*विधान परिषदेतील पाच रिक्त जागांसाठी २७ तारखेला निवडणूक होणार आहेत. यापैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. त्याची यादी भाजपने रविवारी सकाळी जाहीर केली. त्यात संदीप जोशी यांच्यासह आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे आणि संजय केनेकर यांच्या समावेश आहे.
भाजपने तीन पैकी दोन जागा विदर्भात दिल्या आहेत.विधानसभेवर निवडून गेलेल्या पाच विधान परिषद सदस्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त जागांवर ही निवडणूक होत आहे. त्यापैकी नागपूरचे प्रवीण दटके एक आहेत. दटके यांच्या जागेवर संदीप जोशी यांची वर्णी लागेल अशी चर्चा होती. पण भाजपने जी तीनं नावे दिल्लीत पाठवली होती. त्यात जोशी यांचें नाव नव्हते. त्यामुळे जोशी यांची संधी हुकणार? अशी चर्चा सुरू झाली होती. पण रविवारी जाहीर झालेल्या भाजपच्या यादीत जोशींचे नाव असल्याने त्याचे आमदार होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.यापूर्वी जोशी यांना पदवीधर मतदारसंघातून भाजपने संधी दिली होती पण ते पराभूत झाले होते. नगरसेवक ते महापौर असा संदीप जोशी यांचा राजकीय प्रवास आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते गोरगरिबांना मदत करीत असतात.