
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचे कंत्राटी कर्मचारी दोन महिने पगाराविना, माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला इशारा
स्थानिक कर्मचार्यांना हक्क आणि मानधन वेळेवर मिळालेच पाहिजे, नाहीतर गाठ आमच्याशी’ असे सांगत सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचार्यांच्या थकीत पगारावरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक झाले.याप्रश्नी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे यांना जाब विचारला.
सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या 120 हून अधिक स्थानिक कर्मचार्यांना गेल्या दोन महिन्याचे मानधन स्मार्ट सर्व्हिसेस-पुणे या ठेकेदार कंपनीने दिलेले नाही. याबाबत स्थानिक कर्मचार्यांनी माजी आ. वैभव नाईक यांच्याकडे कैफियत मांडली होती. वैभव नाईक यांनी याची दखल घेत गुरुवारी या कर्मचार्यांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडक दिली. यावेळी नाईक यांनी अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे यांना कर्मचार्यांच्या पगाराबाबत विचारणा केली. ठेकेदार स्थानिक कर्मचार्यांवर अन्याय करत असेल, तर तो आम्ही खपवून घेणार नाही. ‘कंत्राटी कर्मचार्यांना त्यांचे मानधन वेळेवर मिळालेच पाहिजे, नाहीतर गाठ आमच्याशी आहे’ असा इशारा वैभव नाईक यांनी दिला.