
पुण्यात ४०२ तळीरामांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत कारवाई; ६,११८ वाहनांसंदर्भात गुन्हे दाखल; ५० लाख ९४ हजार रुपयांचा दंड!
होळी आणि धूलिवंदन सणाच्या निमित्ताने पुणे शहर पोलिसांनी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत ८,५५२ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्या कारवाईदरम्यान ४०२ तळीराम आढळून आले असून, त्यांच्यावर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.*पुणे शहरात होळी आणि धूलिवंदन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी ९१ ठिकाणी नाकाबंदी केली होती.त्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात आल्या. तर यादरम्यान ट्रिपल सीट ९२१, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे ८५२, ड्रंक अँड ड्राईव्ह ४०२ व ३८६ वाहने जप्त करण्यात आली आहेत.या कारवाई दरम्यान एकूण ८,५५२ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, ६,११८ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, त्यादरम्यान ५० लाख ९४ हजार रुपयांचा दंडदेखील वसूल करण्यात आल्याची माहिती पुणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.