
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा यासाठी माजी कृषिमंत्री शरद पवार यांची घेतली भेट.
देवरूख आज दिनांक १२ मार्च २०२५ रोजी माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे पक्षप्रमुख शरदचंद्र पवार साहेब यांची भेट निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या सदस्यांनी घेतली. राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे सरचिटणीस आणि रत्नागिरी जिल्हा निरक्षक श्री बबन कनावजे यांच्या पुढाकाराने ही भेट घेण्यात आली. यावेळी श्री. कनावजे यांचे सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश बने, ग्रुप चे प्रमुख संदेश जिमन,दीपक पवार,मंगेश बाईत ,राकेश शिर्के,हे उपस्थित होते.मागील दीड वर्षांपासून या संघटनेचे सर्व सदस्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधी एकजुटीने आपल्या मागण्यांचा विचार कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाने लवकरात लवकर करावायासाठी निवेदन, प्रस्ताव, आंदोलन, उपोषण,बैठका सर्व गोष्टी करीत आहेत.केवळ वेळकाढूपणा होतो आहे.

आपल्या नंतर मागणी करणारी राज्ये आपल्या राज्यात एक्स्प्रेसला थांबे मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. पण उपेक्षा मात्र संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या वाट्याला आली आहे.सर्वच राजकीय पक्ष , सामाजिक संघटना, वाडी वस्तीतील मंडळे, ग्रामपंचायती, स्थानिक आमदार, खासदार यांची या थांबायसंदर्भात रेल्वेकडे पत्र गेली असुन आता माजी कृषिमंत्री आणि या देशाच्या राजकीय अध्यायातील भिष्म पितामह आदरणीय शरद पवार साहेब यांनी सुद्धा आपले पत्र केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे पाठवले आहे. हे ना ते कारण सांगून वेळकाढूपणा करणारे कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्ड आता तरी आम्हा संगमेश्वर वासी जनतेच्या मागण्यांचा विचार करून थांबे देणार का? याकडे सर्व कोकण वासी यांचे लक्ष लागले आहे!
