
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी अखेर निधी आला; 173 शाळांची दुरूस्ती, 83 नवीन वर्गखोल्या
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसाठी 83 नवीन वर्गखोल्यांसाठी आणि 173 शाळांच्या दुरूस्तीसाठी 3 कोटी 94 लाख 56 हजार 921 रुपये जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त झाले आहेत.नवीन शैक्षणिक वर्षाला 13 जूनपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी शाळा दुरुस्ती व वर्गखोल्यांना निधी मंजूर झाला आहे.
जिल्हाभरातील अनेक शाळांच्या दुरुस्तीसाठी तसेच नवीन वर्गखोल्यांसाठी शासनाकडून निधी मिळत नव्हता. याआधी शाळांच्या गरजेनुसार नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी सर्वशिक्षा अभियानातून निधी मिळत होता. मात्र, या अभियानातून बांधकामासाठी निधी देण्याचे मागील तीन वर्षांपासून बंद करण्यात आले. त्यामुळे आता नवीन वर्गखोल्या जिल्हा वार्षिक योजनेतून घेण्यात येतात. शाळांच्या वर्गखोल्यांसाठी निधी मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा सुरू होता. या वर्गखोल्यांची जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून कामे करण्यात येणार आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेकडून प्रयत्न सुरु आहेत.