
मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला उदंड प्रतिसाद.
२८ जून २०२३ पासून मुंबई-गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला दिवसागणिक चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन महिन्यांत सीएसएमटी- मडगाव गोवा-सीएसएमटी मार्गावर तब्बल ५० हजार ६९० प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.वेगवान आणि सुरक्षित प्रवास, अत्याधुनिक सुविधा यामुळे या मार्गावर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जून २०२३ रोजी मडगाव-मुंबई वंदे भारत ट्रेनचे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले. २८ जून २०२३ पासून सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत आली. पहिल्याच फेरीत एकूण ५३३ आसन क्षमता असणाऱ्या या ट्रेनमध्ये ४७७ आसन फुल्ल झाले होते.मुंबई-मडगाव वंदे भारत सुरुवातीला ९१.४४ ते ९३.११ टक्के क्षमतेने धावत होती.सद्यस्थितीत ही ट्रेन ९५ टक्के क्षमतेने धावत असून, प्रवासी आणि पर्यटक यांचा वाढता प्रतिसाद या वंदे भारत ट्रेनला मिळत आहे.
सध्या या ट्रेनला ८ डबे आहेत.आरामदायी, वेगवान आणि किफायतशीर दरात नागरिकांना प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे मंत्रालयाने मेक इन इंडिया अंतर्गत वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली असून, सध्या मध्य रेल्वेवर सीएसएमटी-सोलापूर, सीएसएमटी-शिर्डी, सीएसएमटी-जालना, सीएसएमटी-मडगाव गोवा या वंदे भारत धावत आहेत. या सर्व गाड्यांना प्रवाशांची पसंती मिळत असून, सुरक्षित प्रवास आणि अत्याधुनिक सुविधांबाबत प्रवाशांकडून दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.