मुंबई गोवा महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामावरून आमदार भास्कर जाधव आक्रमक

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील बहादूरशेख चौकात उड्डाणपूल जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण झालेला असेल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी (11 मार्च) विधानसभेत दिली.काम चालू असताना गर्डर आणि लॉन्चरसह उड्डाणपुलाचा काही भाग कोसळून 7 महिने झाले तरी या पुलाचे काम सुरू झाले नसल्याबाबत आमदार भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्र्यांनी ही ग्वाही दिलीराज्यात समृद्धी महामार्गासह अनेक रस्त्यांची कामे झाली, मात्र कोकणातील या महत्त्वाच्या रस्त्याचे काम रडतखडत सुरू असल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधले. महामार्गावरील परशुराम घाटात रोज दरड खाली येते.

मे 2026 साली रस्ता पूर्ण करणार असे मंत्री सांगत असले तरी या महामार्गावरील अनेक पुलांची कामे बाकी आहेत, हा रस्ता अजून चार वर्ष तुम्ही पूर्ण करू शकणार नाहीत, असा दावा भास्कर जाधव यांनी यावेळी केला. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, चिपळूण शहरातील पुलाचे काम 50 टक्के काम पूर्ण झालेले आहे. जानेवारी 2026 अखेर पुलाचे काम पूर्ण होईल. पुलाचे काम सुरू असताना ते कोसळले, त्याप्रकरणी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाची चौकशी चालू आहे. संबंधित ठेकेदाराला 50 लाखांचा दंड लावला आहे, तसेच पुलाचे डिझाईन करणाऱ्यांना 20 लाखाचा दंड लावला आहे.

इंदापूर आणि माणगाव बायपासची कामे रखडली आहेत. जुना कंत्राटदार काम करत नव्हता, त्यामुळे नवा नियुक्त करत आहोत त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. इथून पुढे अकरा महिन्यांच्या मुदतीत इंदापूर आणि माणगाव बायपासचे काम पूर्ण होईल. संगमेश्वर येथील पॅकेजचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण केले जाईल. परशुराम घाटात नवे डिझाईन केले आहे जेणेकरून सातत्याने दरड कोसळणार नाही, अशी माहितीही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button