
नितेश राणेंनी केलेल्या घोषणेमुळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या खंडोबाच्या भक्तांची नाराजी
मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी मांसविक्रीसंदर्भात केलेल्या एका मोठ्या घोषणेमुळे नवीन वादाला तोंड फुटलेले असतानाच आता या घोषणेवरुन अजून एक वाद निर्माण झाला आहे.नितेश राणेंनी केलेल्या घोषणेमुळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या खंडोबाच्या भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. मांसविक्रीसंदर्भात सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राला ‘मल्हार’ असं नाव देण्यात आल्याने खंडोबाचे भक्त नाराज झाले आहेत. जेजुरीमधील श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी नितेश राणेंना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये खेडेकरांनी आपली बाजू मांडली असून सध्या दिलेलं नाव कसं अयोग्य आहे याबद्दलचं मतप्रदर्शन केलं आहे.खेडेकरांनी सदर निर्णयाला पाठींबा असला तरी नावाला विरोध असल्याचं आपल्या पत्रामधून अधोरेखित केलं आहे. “आपण आज घेतेला निर्णय अत्यंत सार्थ आहे. जेणेकरुन उत्तर प्रदेश सारखाच आपण कोणाकडून मांस विक्री, खरेदी करतोय हे समजायला मदत होईल. तसेच गोमांस किंवा कुत्रे मांस विक्रीला आळा बसेल. मात्र हे करताना एक मल्हार भक्त म्हणून महत्त्वाची सूचना करावी असे वाटते. या योजनेचं नाव आपण त्वरित बदलावं, अशी आम्ही आधी आपल्याला विनंती आहे,” असं पत्राच्या सुरुवातीलाच खेडेकर यांनी स्पष्ट केलं आहे.योजनेचं नाव बदलण्याची मागणी करण्यासंदर्भातील कारणाचा खेडेकर यांनी पत्रात पुढे खुलासा केला आहे. “श्री मल्हार म्हणजे खंडोबा, अवघ्या महाराष्ट्राचे दैवत. ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे. देवाला फक्त पुरणपोळी किंवा चंपाषष्ठीच्या काळात वांग्याचे भरीत रोडगा नैवेद्य असतो. इतकेच नव्हे तर खंडोबा ही देवता मुक्या जणांवर नितांत प्रेम करणारी देवता आहे. म्हणून देवाच्या बाजूला नेहमी घोडा, कुत्रे, बैल आदी प्राण्यांचा सहवास असतो,” असं खेडेकरांनी पत्रात म्हटलं आहे.