
तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात तब्बल 35 कोटी खर्च करून खरेदी केलेल्या नव्या शंभर शववाहिनी मागील तीन-चार महिन्यांपासूनधूळ खात पडून
तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात तब्बल 35 कोटी खर्च करून खरेदी केलेल्या नव्या शंभर शववाहिनी मागील तीन-चार महिन्यांपासून नायडू रुग्णालयाजवळील मोकळ्या जागेत धूळ खात पडून असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे आधीच वादाच्या भोवऱयात असलेल्या तानाजी सावंतांच्या या नव्या कारनाम्याने त्यांच्या भष्ट कारभाराची ‘शंभरी’ भरली आहे.तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी केंद्र सरकारला राज्यात शववाहिका हव्या आहेत असे पत्र दिले होते. हे संपूर्ण कंत्राट 350 कोटी रुपयांचे होते. त्यापैकी केंद्र सरकारने 35 कोटी रुपये मंजूर केले. राज्य सरकारने आयशर कंपनीकडे या शववाहिनींचे कंत्राट दिले होते. त्यानुसार आयशर कंपनीने शंभर अत्याधुनिक शववाहिन्या तयार करून राज्य सरकारकडे सुपुर्द केल्या.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे या शववाहिन्यांचे उद्घाटन झाले. मात्र, या शववाहिनी पुण्यात धूळ खात पडून आहेत. कोणाचे नातेवाईक मृत पावले तर मृतदेह नेण्यासाठी शववाहिनी मिळत नाही. खासगी अॅम्ब्युलन्ससाठी हजारो रुपये द्यावे लागतात. तर दुसरीकडे जनतेच्या पैशांच्या जोरावर कोटय़वधींची टेंडर निघतात. यातून रग्गड कमिशन कमावतात आणि ऐशोआरामासाठी खासगी विमाने परदेशात उडवतात, असा आरोप शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला.शववाहिन्यांचे वितरण का नाही?जानेवारी महिन्यात टप्प्याटप्प्याने या शववाहिन्या सरकारकडे आल्या. या शववाहिन्या पुण्यातील नायडू रूग्णालयाजवळील मोकळ्या जागेत धूळ खात उभ्या आहेत. सरकारकडून अद्यापी या शववाहिन्यांचे वाटप का करण्यात आले नाही? या शववाहिन्यांचे वाटप कधी केले जाणार? या 35 कोटी रुपयांच्या खरेदीत मोठा घोटाळा दडलेला आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे.शववाहिन्यांवर कचरा आणि धूळ साचली आहे.
चाकांची हवा गेली. तसेच बॅटरीही डाऊन झाली आहे. त्यामुळे आता हे सरकार आरटीओ रजिस्ट्रेशन झाले नाही, गाडय़ांना नंबर प्लेट नाही यासारखी कारणे देईल. मात्र, मागील दोन ते अडीच महिन्यांपासून ज्या ठिकाणी या शववाहिनी धुळखात पडून आहेत. त्याच्या शेजारी हाकेच्या अंतरावर आरटीओ कार्यालय आहे.सरकारकडे या गाडय़ांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी निधी नाही का? की यासाठी परत नवीन टेंडर काढणार? असा सवालही उपस्थित केला जात आहे.