
चिपळूण नगरपरिषद ऍक्शन मोडवर, १७७ जणांना जप्तीची नोटीस.
चिपळूण नगरपरिषद हद्दीतील १७७ थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीची २४ तासांची नोटीस नगर परिषदेने बजावली आहे. तरीही कर न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे. तसेच ३२ जणांची नळकनेक्शन तोडण्यात आली असून कारवाईनंतर अनेकजण पैसे भरत आहेत. आतापर्यंत ५६ टक्के वसुली झाली आहे.
नगर परिषदेला यावर्षी मालमत्ता व पाणीपट्टी करातून थकीत व चालू वर्षाची मिळून १८ कोटी ३३ लाख ८१ हजार ५३७ रुपयांची वसुली अपेक्षित आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे १० कोटी रुपये वसुल झाले असून ५६ टक्के वसुली झाली आहे. वसुलीबाबत शासनाचे कडक धोरण असल्याने व अपेक्षित वसुली न झाल्यास त्याचा अनुदान मिळण्यास मोठा फटका बसत असल्याने मुख्याधिकारी विशाल भोसले, उपमुख्याधिकारी तथा कर वसुली अधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे यांनी वसुलीचा टक्का वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. मुख्याधिकारी भोसले स्वतः वसुलीसाठी शहरात फिरत आहेत.www.konkantoday.com