
खेडसह दिवाणखवटी, कळंबणी रेल्वेस्थानकांवर वॉच, २४ एसआरएफचे जवान तैनात.
कोकण मार्गावर रेल्वेगाड्यातून प्रवास करणार्या महिला प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्यासह पर्समधील दागिने लंपास करण्याचे प्रकार वाढल्याने प्रवाशांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. विशेषतः खेड रेल्वेस्थानकासह दिवाणखवटी, कळंबणी बुद्रूक स्थानकात सातत्याने चोर्यांच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तीनही स्थानकात आता गस्त घालण्यात येणार असून यासाठी २४ एसआरएफचे जवान रविवारपासून तैनात करण्यात आले आहेत.
स्थानिक पोलिसांची कुमकही दिमतीला राहणार आहे.कोकण मार्गावर रेल्वेगाड्यातून खिडकीजवळ बसून प्रवास करणार्या महिलांच्या गळ्यातील अज्ञात चोरट्यांकडून मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार सुरू आहेत. याशिवाय महिला प्रवासी डब्यातील आसनावर झोपल्या असल्याची संधी साधत डोक्याखालील सोन्याचे दागिने व रोकड असलेली पर्स लांबवण्याच्या घटना देखील घडत आहेत. सततच्या चोर्यांमुळे प्रवासी विशेषतः महिला प्रवासी मेटाकुटीस आले असून भीतीचे वातावरण कायम आहे.
सहा दिवसांपूर्वीच मडगाव-नागपूर स्पेशलसह तुतारी एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या दोन महिलांच्या चार लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत पलायन केले. या दोन्ही घटना खेड रेल्वेस्थानकासह कळंबणी बुद्रूक स्थानकात रेल्वेगाड्या क्रॉसिंगसाठी थांबल्या असताना घडल्या होत्या. यापूर्वीही खेड रेल्वेस्थानकासह दिवाणखवटी, कळंबणी बुद्रूक रेल्वेस्थानकात रात्री व पहाटेच्या सुमारास रेल्वेगाड्या थांबल्या असताना खिडकीजवळ बसलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले होते.www.konkantoday.com