
शिवसेनेकडून (ठाकरे) तहसीलदार यांच्याशी विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा
अडचणींमध्ये जातीने लक्ष घालून समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे तहसीलदारांकडून आश्वासन
*रत्नागिरी :* शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (११ मार्च) रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेऊन जनतेला होणार्या त्रासदायक कार्यपद्धतीबाबत विविध विषयांवर चर्चा केली. यामध्ये ऑनलाईन रेशनकार्ड होण्यासाठी लागणार वेळ, नवीन रेशनकार्ड मिळण्यास होणारा उशीर, रेशन कार्डावर नवीन नाव चढविण्यासाठी लागणारा बराच कालावधी, रेशन दुकानदारांचा मनमानी कारभार, आरोग्य विषयक शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी रेशनकार्डवर उत्पन्न दाखला मिळण्यास होणारी अडचण या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
जनतेला भेडसावणाऱ्या या सर्व अडचणींमध्ये आपण जातीने लक्ष घालून समस्या लवकरात लवकर सोडवू, असे आश्वासन तहसीलदार श्री. म्हात्रे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.यावेळी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना तालुकाप्रमुख तथा शहर संघटक प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितिन तळेकर, विभागप्रमुख मयुरेश्वर पाटील, किरण तोडणकर, विभाग प्रमुख सलील डाफळे, संदेश भिसे, प्रशांत सुर्वे, अमित खडसोडे, साजिद पावसकर, बंड्याशेठ सुर्वे, बिपीन शिवलकर, अभय पवार, रूपेश पवार, रामदास शिर्के, निखिल बने आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.