महिलांनी स्वतःसाठीही जगण्याची गरज आहे, स्वतः साठी जगा – आरोग्याची काळजी घ्या. डॉ. श्रृती कदम, वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र वाटद खंडाळा यांचे प्रतिपादन.

जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न, अध्यक्षपदी अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त माजी सरपंच सुमित्रा बलेकर.

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीच्या वतीने जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी कोरोना काळात निस्वार्थी सेवा दिल्यामुळे पुरस्कार प्राप्त प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रृती कदम मॅडम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी सरपंच सुमित्रा बलेकर होत्या तर या सभेसाठी सरपंच सतीश थुळ ,उपसरपंच चंद्रकांत मालप, ग्रा.प सदस्य अरुण मोर्ये, प्रणाली मालप, निकिता शिगवण, ममता बंडबे,ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत कुळये, म. गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष केशव बलेकर, सैतवडे उपकेंद्राच्या धनश्री पावरी, उमेदच्या वाटद प्रभाग व्यवस्थापक दिक्षा निवळकर, अनुजा सावंत हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उमेदच्या वाटद प्रभाग व्यवस्थापक दिक्षा निवळकर, अनुजा सावंत यांनीही सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमात विविध उपक्रम राबविण्यात आले. महिलांचे समुहगीत गायन, रांगोळी सजावट, कर्तृत्ववान महिलांचे सन्मान, मान्यवरांचे मार्गदर्शन व मनोरंजनाचे खेळ असे उपक्रम घेण्यात आले. हा कार्यक्रम महसूल गाव कांबळे लावगण येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी बोलतांना सरपंच सतिश थुळ म्हणाले की, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रत्येक महिला साक्षर असेल कुणीही अंगठा करणार नाही. तसेच प्रत्येक घर पती-पत्नीच्या जोडनावावर करण्यात आले आहे. तशी पुढील काळात घराच्या दारावर नावाची पाटी लागणार आहे.यावेळी अनेक घोषणा करण्यात आल्या. यामध्ये सर्वस्तरातील महिलांना समान मंच व सन्मान करणार, महिलांच्या आरोग्य जागृतीसाठी आरोग्य शिबीर आयोजित करणार, रोजगार निमितीसाठी शेवगा लागवड करणार..

महिला रोपवाटिका निर्मितीत सक्रिय सहभागी करून घेणार, शासकीय योजना एका क्लिकवर समजण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या स्कॅनरचा वापर करणार , महिलांना व्यवसाय व स्वावलंबन प्रशिक्षण व मार्गदर्शन, कर्तृत्ववान महिलांचा जाहीर सन्मान करणार .तसेच विविध योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेचे दत्तात्रय गुरव व हेरिटेज संस्था लांजाचे संतोष कांबळे यांचं मोलाचे सहकार्य लाभले असे सरपंच सतिश थुळ यांनी सांगितले.

यावेळी सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव,महिला सक्षमिकरण व आरोग्यदायी गाव याबाबत चर्चासत्र व संकल्प करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना संबोधित करताना ग्रामपंचायत सदस्य सदस्य तथा साहित्यिक अरुण मोर्ये यांनी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई अशा कर्तबगार महिलांचा आदर्श घेत स्वतः साठी जगता जगता समाजासाठी जगा असे आवाहन केले. यावेळी स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच चंद्रकांत मालप यांनी केले तर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शक्ती ग्रामसंघ कांबळेलावगण व तिरंगा ग्रामसंघ सत्कोंडी, समुह संसाधन व्यक्ती प्रणाली मालप, संगीता मोर्ये, रसिका महाकाळ, आशा वर्कर्स नेहा पवार, सुजाता खापले, अंगणवाडी सेविका कमल मालप, रूपाली महाकाळ चित्रा बैकर, पोपा. सुहानी बलेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.कांबळेलावगण, पन्हळी व सत्कोंडी गावातील महिलांनी व जि. प. शाळा कांबळे लावगणचे विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button