
गंगा स्वच्छतेवर खर्च केलेल्या २० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी- मनसेचा भाजपावर आरोप
गंगा नदीसंदर्भात राज ठाकरे यांनी केलेले विधान नीट ऐकले तर एक गोष्ट लक्षात येईल की, ही सर्व भारतातील जनतेची भावना आहे. राज ठाकरे यांचा गंगास्नान करण्याला विरोध नाही. पण जी घाण केली जाते त्याला त्यांचा विरोध आहे. गंगा स्वच्छतेसाठी २० हजार कोटी रुपये खर्च केले. त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. भाजपाची ओरड ही गंगा स्वच्छतेवर खर्च केलेल्या २० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी आहे. त्यासाठी भाजपाचा टीकेचा खटाटोप आहे. तो भ्रष्टाचार आहे. भाजपाने माफी मागितली पाहिजे. हे भाजपाचेच पाप आहे, या शब्दांत मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर केल्या जात असलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
कुंभमेळ्याला जाऊन आल्यावर बाळा नांदगावकर यांनी मला कमंडलूमधील पाणी दिले. ते म्हणाले, पिणार का? मी नाही म्हटले. देशातील एकही नदी स्वच्छ नाही, तरीही आम्ही नदीला माता म्हणतो. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही, असे परखड मत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, याला मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले.
अविनाश जाधव पुढे म्हणाले की, आम्हाला हिंदुत्वाच्या गोष्टी भाजपाने शिकवू नये. जे बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांना जमले नाही ते राज ठाकरे यांनी केले. मशिदीवरील भोंगे राज ठाकरेंनी उतरवले. राज ठाकरे यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका बदलली नाही. फक्त परिस्थिती समाजासमोर मांडली. तसेच गंगा स्वच्छ करण्याच्या गोष्टी राजीव गांधी यांच्या काळापासून सुरू असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. भाजपाला वाईट वाटायचे कारण नव्हते. गंगेचे पाणी वापरण्यायोग्य नाही हे अनेकांनी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करून दाखवले आहे.
भाजपाची खरे ऐकण्याची क्षमता नाही. आपल्याला हवे तेच हिंदुत्व अशी अवस्था भाजपाची झाली आहे, असे प्रत्युत्तर अविनाश जाधव यांनी दिले.दरम्यान, गंगा स्वच्छ झालेली नाही. स्वच्छतेच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार झाला. हे भाजपाचेच पाप आहे. राज ठाकरे प्रत्येक वेळी हिंदुत्वावर बोलतानाच रस्त्यावरचे नमाज आणि मशिदीवरील भोंग्यांवरही बोलले आहेत. नितेश राणे यांनी राज ठाकरे यांची भाषणे ऐकली पाहिजेत. त्यांना हवे असल्यास राज ठाकरे यांच्या भाषणे मी पाठवून देईल, असा टोला अविनाश जाधव यांनी लगावला.