
कसबा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभारणार : मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
हिंदू धर्माकडे जो वाकड्या नजरेने बघेल तिथेच ठेचले जाईल अशीच महाराजांची शिकवण होती.
छत्रपती संभाजी नगर येथील काळा ठिपका लवकरच हटवला जाईल.

धर्मासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्या धर्मवीरांची प्रेरणा पुढच्या पिढ्याही घेणार
कसबा संगमेश्वर येथे झाला हिंदू धर्म रक्षण दिन आणि धर्मविरांच्या बलिदानाचे स्मरण

रत्नागिरी । धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिले आणि आम्हाला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे या भूमीत भव्य स्मारक करण्यात येईल, हा महायुती सरकारचा निर्धार आहे आणि सारे जग या स्मारकासमोर नतमस्तक होईल, यातून पुढच्या पिढ्या प्रेरणा घेतील असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. तर हिंदू धर्माकडे जो वाकड्या नजरेने पाहील त्याला तिथेच ठेचले जाईल हीच आमच्या महाराजांची शिकवण असून छत्रपती संभाजी नगर येथील स्वराज्यातील काळा ठिबका लवकरच हटवला जाईल असेही वक्तव्य त्यांनी केले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनादिवशी कसबा संगमेश्वर येथे झालेल्या हिंदू धर्म रक्षण दिनाच्या निमित्ताने ना. राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. शेखर निकम, आ. प्रसाद लाड, माजी आ. प्रमोद जठार, सदानंद चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित अन्य पदाधिकारी आणि शिव शंभू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना ना. नितेश राणे म्हणाले की आज मी मंत्री किंवा आमदार म्हणून नव्हे तर एक हिंदू म्हणून या भूमीत मी उपस्थित आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्याची आठवण म्हणून येथे उपस्थित आहे.

राजांनी हिंदू धर्मासाठी पिढ्यानपिढ्यांसमोर इतिहास रचून ठेवला आहे त्याची आठवण करून देणारा हा दिवस आहे. त्यांचं हे बलिदान असच चिरंतन स्मरणात राहवे यासाठी या भूमीत त्यांचं भव्य स्मारक व्हावं यासाठी महायुती सरकारने अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली आहे. महायुती सरकारच इथे महाराजांचं भव्य स्मारक करणार आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंदुत्ववादी विचारांचे आहेत. त्यांच्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या इच्छाशक्तीमुळे या महायुती सरकारनं स्मारकासाठी तरतूद केली आहे. सरदेसाई कुटुंबियांची आम्ही बोलणार आहोत, त्यांचा यथायोग्य सन्मान करून महाराजांचा भव्य दिव्य स्मारक आम्ही इथे उभं करणार आहोत. यात कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही. हिंदू म्हणून महाराजांनी आमच्यासाठी बलिदान केलं म्हणूनच आमचे आडनाव हिंदू राहिली आहेत हे कधीही विसरले जाणार नाही. देशाचं इस्लामीकरण करण्याचा मुघलांनी, औरंग्यानं ठरवलं होतं म्हणूनच त्यांनी आमची मंदिर पाडली, आमच्या माता भगिनींचा अमानुष छळ केला गेला. म्हणूनच त्यावेळचे युद्ध हे हिंदू विरुद्ध मुसलमान असंच होतं.
आमच्या राजांनी तेव्हा आमच्या हिंदू धर्माला झुकायला दिलं नाही पण आता काही अतिशहाणे ज्यांची दुकानं या विषयावर चालतात ते मात्र राजांची बदनामी करायला लागले आहेत. महाराजांच्या सैन्यात मुसलमान होते अस सांगत चुकीचा इतिहास समोर आणायला लागले आहेत. पण हिंदू धर्माकडे वाकड्या नजरेने जो पाहील त्याला तिथेच ठेचले जाईल असं अशी शिकवण महाराजांनी आम्हाला दिली आहे आणि त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे ना. राणे म्हणाले.लोकसभेनंतर हिरवी वळवळ वाढली होती. मात्र विधानसभेमध्ये कडवट हिंदूंनी हिंदूंच सरकार आणलं आहे. त्यामुळे तितक्याच उत्साहात हिंदूंचे सण उत्सव साजरे होणार आहेत. आता हिंदू धर्माचे रक्षण हे आमचं कर्तव्य आहे . त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इथलं भव्य दिव्य स्मारक हे महायुती सरकारच्याच कालावधीत होणार हे नक्की आहे. जगभरातून इथे महाराजांसमोर नतमस्तक होण्यासाठी माणसे येथील असा विश्वास ना. नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले हिंदू या विषयात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.
पदे आज आहेत आणि उद्या नाहीत, मात्र माझ्या जन्मपत्रिकेवर हिंदू लिहिल आहे हे मी कधीच विसरणार नाही. आज महाराष्ट्रात स्वराज्यामध्ये एक काळा ठिपका छत्रपती संभाजी नगर येथे आहे, पण तो इथून घालवला पाहिजे हीच सरकारची मानसिकता आहे, हा कार्यक्रम नक्की होणार आहे, आम्हाला या राज्यात स्वराज्याच्या आठवणी ठेवायच्या आहेत त्यामुळे कितीही विरोध झाला तर त्याच्या अधिक सक्षमपणे आणि समर्थपणे ही कारवाई केली जाणार आहे असेही ना. राणे यांनी स्पष्ट केले. महाराजांना असंख्य वेदना दिल्या पण त्यांनी धर्म बदलला नाही त्यामुळे स्मारक तर बनणार आहेत पण त्याचवेळी हिंदू म्हणून केवळ डोक्यावर भगव्या टोप्या न घालता हिंदू धर्म रक्षणाची शपथ प्रत्येकाने घेतली पाहिजे.
आपले राजांना, त्यांच्या विचारांना हृदयात ठेवलं पाहिजे, कडवट हिंदू झालं पाहिजे तरच आपल्या राजांना वाटेल की माझ्या बलिदानानंतर इतक्या पिढ्या नंतरही धर्मरक्षणासाठी आजची पिढी सक्षमपणे पुढे येते आहे. सध्या हिंदू धर्माची बदनामी हा एक कलमी कार्यंक्रम आहे त्याच्या विरोधात उभे राहिले पाहिजे असेही ते म्हणाले. या वेळेला कुंभ मेळ्यावर झालेल्या टीकेचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर पोवाडा सादर करण्यात आला. चैत्राली नारायण सुर्वे या बालिकेने महाराजांची गारद घातली. मोठ्या संख्येने शिव शंभू प्रेमी कडवट हिंदू येथे उपस्थित होते. यानंतर कसाब येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर ना. राणे व अन्य मान्यवरांनी अभिवादन करून त्यांना पुष्प अर्पण केले.