
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढत असून प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी संख्याही घसरणीस लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शून्य पटसंख्येच्या कारणाने 16 प्राथमिक शाळा बंद झाल्या आहेत तर 1 हजार 802 विद्यार्थी संख्या घटली आहे.जिल्ह्याचा जन्मदर घटला असल्याने शाळा शून्य पटसंख्येच्या होत आहेत, अशी माहिती जिल्हा प्राथ. शिक्षणाधिकारी गणपती करमळकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन 2023- 24 मध्ये 1 हजार 360 प्राथमिक शाळा होत्या. तर सन 2024-25 मध्ये 1 हजार 344 प्राथमिक शाळा आहेत. यावर्षी जिल्ह्यातील 16 शाळा शून्य पटसंख्या झाल्याने बंद कराव्या लागल्या आहेत. या प्राथमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्या सन 2023-24 मध्ये 32 हजार 948 होती, पण विद्यार्थी पटसंख्या घसरणीस लागल्याने सन 2024-25 मध्ये विद्यार्थी पटसंख्या 31 हजार 146 झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 1 हजार 802 विद्यार्थी घटले आहेत