
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटातील दरड दूर करण्यात यश , वाहतूक सुरू
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून संततधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील फोंडाघाटात ६२/६६०० किलोमीटर अंतरावरील परिसरात शनिवारी सकाळी दरड कोसळली. दरडीचे दगड, मलबा, माती रस्त्यावर पसरल्याने तेथील वाहतूक बंद झाली होती.मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली.
रस्ता बंद झाल्याचे समजताच फोंडाघाटात हजर असणारे वाहतूक पोलिस तत्काळ कार्यरत झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता बंद झाल्याची माहिती समजताच उपकार्यकारी अभियंता के.के. प्रभू, शाखाअभियंता प्रमोद कांबळे तसेच कर्मचारी शाहू शेळके, पावसकर, सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पवन भालेकर यांच्या जेसीबी द्वारे दरडी हटवून एक मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.सतत पाऊस पडल्यास रस्ता रुंदीकरणामुळे घळणी मोकळ्या झाल्याने, दरडी कोसळण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे. तेथील स्थितीवर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिस लक्ष देऊन आहेत. दोन जेसीबी तसेच कर्मचारी घटनास्थळापासूनच जवळच कार्यरत ठेवण्यात आले आहेत. असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
www.konkantoday.com