
निवडणुका महायुतीनेच लढणार, मंत्री उदय सामंत
मी महायुतीच्या महाराष्ट्राच्या समन्वय समितीवर आहे आणि त्यात शिंदेसेनेचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढवाव्यात, याबाबतचा निर्णय त्यामध्ये तिन्ही पक्ष मिळून घेणार आहोत.त्यामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षाला मी उत्तर देऊ शकत नाही. मात्र, पुढील निवडणुका महायुतीनेच लढविण्यात येतील, अशी भूमिका राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली.
भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती अशी पदे भाजपला न मिळाल्यास वेगळा विचार केला जाईल, अशी भूमिका जाहीर केली होती. आपण महायुतीच्या राज्याच्या समन्वय समितीवर आहोत. त्यामुळे एखाद्या जिल्हाध्यक्षाच्या विधानावर प्रतिक्रिया देण्याची आपल्याला आवश्यकता वाटत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
मराठवाड्याची स्थिती अतिशय भयावह आहे. त्यासाठी कंपन्यांनी सीएसआरमधून मदत करावी. आपणही त्यासाठी मदत करत आहोत. लोकांनीही मदत करायला पाहिजे, असे ते म्हणाले. राज्यातील ही परिस्थिती पाहून आझाद मैदानावर होणारा शिंदेसेनेचा मेळावा स्थगित करण्यात आला आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभार मानले.




