रत्नागिरी येथे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे घंटानाद आंदोलन !

देवरहाटीच्या जमिनी देवस्थानाच्या नावे करण्याविषयी शासनाने चालू अधिवेशनात सकारात्मक पाऊल उचलावे ! - मंदिर विश्वस्तांची आग्रही मागणी

रत्नागिरी,* – देवरहाटी / देवराई हा ग्रामस्थांच्या श्रद्धेचा आणि धार्मिक परंपरेचा विषय आहे, असे असूनही महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधील प्रावधानाचा भंग करून, तसेच मंदिरे धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर नसल्याचे कारण देत बेकायदेशीरपणे देवस्थानचे नाव कमी केले आणि ‘महाराष्ट्र शासन’ अशी नोंद केली. याद्वारे शासनाने हिंदूंच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांचे उल्लंघन केले आहे. तालुक्यातील जयस्तंभ येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने झालेल्या आंदोलनाद्वारे शासनाने हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अनादर केल्याने निषेध नोंदवण्यात आला. महाराष्ट्र शासनाने चालू अधिवेशनात ‘देवरहाटीच्या जमिनीवरील शासनाचा हक्क कमी करून त्या पुन्हा देवस्थानाच्या नावे करण्याचा निर्णय घ्यावा’, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात अधिक तीव्र करण्याची चेतावणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने शासन आणि प्रशासनाला दिली आहे. या आंदोलनाला मंदिर विश्वस्तांचा चांगला प्रतिसाद होता.

आंदोलनानंतर मा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना देण्यात आले. यावेळी संगमेश्वर येथील श्रीदेव निळकंठेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री. जयंत आठल्ये, सचिव श्री. चैतन्य सरदेशपांडे, लांजा येथील श्री जुगाई पौलस्तेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री. मुकुंद गांधी, श्री. संतोष लिंगायत, कारवली येथील श्री काळंबा देवीचे श्री. अरविंद वरेकर, शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर, नेवरे येथील श्रीदेव विश्वेश्वरचे अध्यक्ष श्री. मुकुंद परांजपे, पाली येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. प.वि. सावंत, मुरुगवाडा येथील श्री भैरी देवस्थानचे विश्वस्त श्री. विजय पिळणकर, राजापूर येथील धोपेश्वर देवस्थानचे श्री. प्रकाश कांबळे, गोठणे दोनिवडेचे श्री. सुधीर विचारे, शीळ येथील श्री. गोपाळ गोंडाळ, न्यू हनुमान मंदिर, खडपेवाडी-राजापूरचे अध्यक्ष श्री. मनिष शिंदे, आंबेवाडी ग्रामस्थ विकास मंडळ राजापूरचे अध्यक्ष श्री. प्रकाश लोळगे, श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर राजापूरचे श्री. विजय हिवाळकर, वाटद-खंडाळा येथील सौ. प्राजक्ता जंगम यांच्यासह १०० हून अधिक विश्वस्त, हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

*देवरहाटी पूर्ववत देवस्थानच्या नावे व्हाव्यात ! – श्री. मनोहर मोरे, अध्यक्ष, श्री देव आदित्यनाथ मंदिर, नेवरे* देवस्थानांना विचारात न घेता, कोणतीही सूचना न देता आणि आपण देवस्थानचेच वारस आहोत या भ्रमाने देवस्थान जमिनी शासनाने कह्यात घेतल्या. शासनाच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि या देवरहाटी पूर्ववत देवस्थानच्या नावे व्हाव्यात, अशी मागणी करतो.

शासनाने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करून नोंदी देवस्थानच्या नावे पूर्ववत कराव्यात ! – गोविंद भारद्वाज, हिंदु जनजागृती समिती* कोणत्याही जमिनीवरील मालकी हक्क सिद्ध करण्याचे सक्षम प्राधीकरण हे दिवाणी न्यायालय असतांना महसूल विभागाद्वारे देवराई/देवरहाटी जमिनीचा मालकी हक्क पालटणे, ही बेकायदेशीर, अवैध गोष्ट ठरते. हा राज्यघटनेने दिलेल्या हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवरील घालाही आहे. शासनाने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करून नोंदी देवस्थानच्या नावे पूर्ववत कराव्यात.

*देवरहाटीच्या मागणीला यश मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवू ! – सुरेश शिंदे, महाराष्ट्र मंदिर महासंघ, जिल्हा संघटक* शासनाने देवस्थानची देवरहाटीवरील नावे कमी केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मंदिर विश्वस्त आता मंदिरांच्या हक्कासाठी मंदिर महासंघाच्या माध्यमातून जागृत आणि संघटित होत आहेत. देवरहाटीच्या मागणीला यश मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button