
‘मारल्या होत्या थापा भारी आणि महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी’;
अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका!
: मुंबई – महाराष्ट्र राज्याचा वर्ष 2025-26 साठीचा अर्थसंकल्प आज सादर झाला. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती सरकार राज्यातील जनतेला बजेटमधून काय- काय देणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या बजेटमधून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्यात. अर्थसंकल्पानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारने सादर केलेला आजचा अर्थसंकल्प मागील 10 हजार वर्षांतील सर्वात बोगस असल्याची टीका केली आहे.
आजचा अर्थसंकल्प पाहून मला आचार्य अत्रे यांची आठवण झाली. आज ते असते तर असा बोगस अर्थसंकल्प मी मागच्या 10 हजार वर्षांत पाहिला नाही असे ते म्हणाले असते. उद्याचा सूर्य उगवेल, सर्वांना प्रकाश मिळेल व त्यातून व्हिटॅमिन बी सुद्धा मिळेल अशा आशयाचे हे बजेटचे आहे.
‘मारल्या होत्या थापा भारी आणि महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी’,
उद्धव ठाकरे म्हणाले, “विधानसभा निवडणुकीच्या काळातील महायुतीची एक जाहिरात दाखवत उद्धव ठाकरे म्हणाले की, मारल्या थापा भारी अन् महाराष्ट्र केला कर्जबाजारी, ही ओळख घेऊन आता त्यांनी पुढे जायला हवं. आम्ही थापा मारू, पण थापा मारण्याचं आम्ही थांबणार नाही, हे त्यांचं घोषवाक्य झालं आहे.”आजच्या या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काहीच नाही. हा अर्थसंकल्प लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे, अशी टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, “आजच्या या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काहीच नाही. पण कॉन्ट्रॅक्टरसाठी (कंत्राटदारांची) भरपूर काही आहे.
मुंबईमध्ये 64 हजार 783 कोटींची विकासकामं आहेत, याने कसला आणि कोणाचा विकास होणार आहे. यात फक्त कॉन्ट्रॅक्टरचा विकास होणार आहे. कारण, आताच मुंबईत काही रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यातच आणखी एक महत्वाचा म्हणजे मुद्दा म्हणजे मेट्रोने दोन विमानतळं जोडण्याचं काम सरकार करणार आहे. हे काम अदानी यांचं आहे. कारण विमानतळाची कामे आणि जागा जर अदानी यांना दिली असेल तर, हे काम अदानी यांनी केलं पाहिजे, हे सरकारचं काम नाही. उद्या तुम्ही (महायुती सरकार) म्हणाल, अदानी यांना विमानतळाची जागा दिली आहे, त्यावर धावपट्टी बांधून देऊ. केवळ तुम्ही तुमच्या मालकाच्या मित्राच्या हिताची कामे करत आहेत, त्यातलंच हे एक काम आहे.”
उद्धव ठाकरे म्हणाले, महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची हमी दिली होती. पण त्यावर या बजेटमध्ये काहीही नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या आश्वासनावरहीही यात काही नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारण नसताना माझे नाव भाषणात घेतले. स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही असे ते म्हणाले होते.
त्यावर मी त्यांना सांगितले होते की, तुम्हाला उद्धव ठाकरे होता येणार नाही. कारण, उद्धव ठाकरे व्हायचे असेल तर दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागतात. माझ्या नेतृत्वातील सरकारने नागपूर येथे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम जारी केला होता. त्या धर्तीवर मी मुख्यमंत्र्यांना या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आव्हान दिले होते.