
महिलांनी अत्याचाराविरोधात लढण्यासाठी स्वयंसिध्दा व्हावे : सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रद्धा कळंबटे यांचे प्रतिपादन
कुवारबावच्या मेळाव्यात मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा सन्मान.
. रत्नागिरी : आज महिलांची छेडछाड, अत्याचार, घरगुती वाद, कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार वाढीस लागले असून त्या विरोधात लढण्यासाठी महिलांनी आत्मनिर्भरतेने स्वयंसिद्ध होणे काळाची गरज आहे, प्रतिपादन स्वयंसेतू संस्थेच्या संचालिका सौ. श्रद्धा कळंबटे यांनी केले.
कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला विभागाने जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 9 मार्च रोजी आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री जोशी या होत्याकोणत्याही संकटात असलेल्या महिला ज्येष्ठ नागरिक, अत्याचार ग्रस्त व्यक्ती, त्यांच्या मदतीला धावून जाणारी महाराष्ट्र पोलीस दलाची 112 क्रमांकाची हेल्पलाइन उपलब्ध असून त्यावर संपर्क साधल्यास पोलीस तत्काळ मदतीला धावून येतात, असे त्यांनी अनेक अनुभवातून स्पष्ट केले. कुटुंबात केवळ मुलींच्या जन्माचे स्वागत करणाऱ्या मातांचा यावेळी त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉक्टर सपना करे यांनी महिलांना निरामय जीवनासाठी आयुर्वेद आणि आहार महत्त्वाचे असल्याचे सांगून मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी आयुर्वेदिक उपचार महत्त्वाचे असल्याचे विशद केले.प्रारंभी दीप प्रज्वलन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर प्रास्ताविकात महिला संघटक सुवर्णा चव्हाण यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व विशद करून कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन सौ. गौरी जोशी यांनी केले तर संयोजन सौ. शुभांगी भावे, श्रीमती वृषाली घाणेकर आणि वंदना कोतवडेकर यांनी केले. शेवटी सौ. स्नेहल वैशंपायन यांनी आभार प्रदर्शन केले