
महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 10 : “महाराष्ट्र आता थांबणार नाही… विकास आता लांबणार नाही…,” असा निर्धार व्यक्त करत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक, कृषी आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार स्वागत केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासाला निश्चित दिशा देणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात उद्योग धोरण, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास, महिला सन्मानाच्या योजना, कृषी क्षेत्राला बळकटी आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारश्याचा तसेच महापुरुषांचा सन्मान यावर विशेष भर देण्यात आला आहे.उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींचा विचार करता, ‘मेक इन महाराष्ट्र’ धोरणांतर्गत पुढील पाच वर्षांत ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र शासनाने केलेल्या ६३ सामंजस्य करारांमुळे १५.७२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होणार आहे. या गुंतवणुकीतून तब्बल १६ लाख नव्या रोजगार संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुलेट ट्रेन, मल्टीमोडल कॉरिडॉर आणि मेट्रो प्रकल्पांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत ३०० बिलियन डॉलरवर नेण्याचे आणि २०४७ पर्यंत १.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.कृषी क्षेत्राच्या विकासासाठीही अर्थसंकल्पात ठोस पावले उचलण्यात आली आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत कृषी विकास दरात मोठी सुधारणा झाली असून, त्यामध्ये ८.७ टक्के वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उत्पादनात मूल्यवर्धन, सिंचन सुविधा आणि सौरऊर्जा प्रकल्पांना चालना देण्यावर भर देण्यात आला आहे.महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी म्हणून ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी ३६,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांचा आत्मसन्मान वृद्धिंगत होईल.महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारश्याच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेच्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आग्र्यात भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारने यासाठी जमीन देण्यास मान्यता दिली असून, या ऐतिहासिक निर्णयाबद्दल महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश शासनाचे मनःपूर्वक आभार मानावेसे वाटतात. छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यांचा मुत्सद्दीपणा येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण आणि विस्तार करण्यासाठी अखेरपर्यंत लढा देणारे आणि एकही लढाई न हारलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक संगमेश्वर येथे उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.
औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याला शर्थीची झुंज देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळांपैकी मौजे तुळापूर आणि मौजे वढू-बुद्रूक येथील स्मारकांचे कामही प्रगतीपथावर आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा स्फूर्तीदायी इतिहास येणाऱ्या पिढ्यांना समजावा यासाठी शासन योग्य ती सर्व पावले उचलत आहे.मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या प्रक्रियेला अधिक बळकटी देण्यात आली आहे. याअंतर्गत दरवर्षी ३ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच, ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यास चालना मिळेल आणि मातृभाषेचा गौरव अधिक वृद्धिंगत होईल.उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी दिशादर्शक असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधा यांना भरीव गती मिळणार असून, महाराष्ट्राच्या विकासाचा आलेख सतत उंचावत ठेवण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.