
भारतीय नर्स निमिषा प्रियाला १६ जुलै रोजी येमेनमध्ये होणार फाशी, जाणून घ्या नेमकं हे सगळं प्रकरण काय?
: केरळमधल्या पलक्कडमध्ये राहणारी आणि परिचारिका अर्थात नर्स असलेल्या निमिषा प्रियाला १६ जुलै रोजी येमेनमध्ये फाशी दिलं जाईल. मानवाधिकार कार्यकर्ते सॅम्युअल जेरोम यांनी दिलेल्या माहितीनुसार निमिषा प्रियावर येमेनमधल्या एका नागरिकाची हत्या केल्याचा आरोप आहे. ती या प्रकरणी तुरुंगात आहे. जेरोम यांच्याकडे निमिषा प्रियाची आई प्रेमा कुमारी यांची पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. जेरोम यांनी दिलेल्या माहितीनुसार निमिषा प्रियाला १६ जुलै रोजी फाशी दिली जाणार आहे. तुरुंग प्रशासनाने या आदेशावर सही केली आहे. त्यामुळे निमिषा प्रियाला फाशी होणार हे निश्चित मानलं जातं आहे.*सॅम्युअल जेरोम यांनी काय सांगितलं?*सॅम्युअल जेरोम यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तिच्या कुटुंबाकडून या निर्णयाबाबत प्रतिक्रिया आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही काही पर्याय शिल्लक आहेत. तसंच भारत सरकारकडून तिला फाशी होऊ नये म्हणून प्रयत्न केले जाऊ शकतात. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
केरळची असलेली निमिषा प्रिया तिचा नर्सिंगचा कोर्स पूर्ण केल्यानंतर २०११ मध्ये येमेनला गेली आणि तिथेच स्थायिक झाली. आपल्या आई वडिलांना चांगलं आयुष्य जगता यावं या उद्देशाने तिने येमेनला जाण्याचा पर्याय निवडला होता. तिचे आई आणि वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. सुरुवातीला निमिषाने येमेनमधल्या अनेक रुग्णालयांमध्ये तिने काम केलं. त्यानंतर तिने तिचं क्लिनिक सुरु करण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये तिचा संपर्क तलाल अब्दो महदींशी झाला होता. तलाल अब्दो यांनी येमेनमध्ये क्लिनिक सुरु करण्याची संमती दिली होती. निमिषाला क्लिनिक सुरु करण्याची संमती देण्यात आली. त्यासाठी काही अटी शर्थी ठेवण्यात आल्या होत्या. निमिषाने महदी यांच्याशी तिने भागिदारी केली आणि क्लिनिक सुरु केलं होतं. कारण बाहेरुन आलेल्या व्यक्तीला येमेनमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरु करता येत नाही. त्यासाठी त्याला तिथल्या माणसाशी भागिदारी करावी लागते. मात्र नंतर या दोघांचे मतभेद झाले. त्यावेळी निमिषाने महदी यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला. तसंच त्यांनी माझा पासपोर्ट स्वतःकडे ठेवला आहे असाही आरोप केला होता.
*निमिषाने महदींच्या विरोधात पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर महदीला २०१६ मध्ये पोलिसांनी अटक केली. मात्र त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं. २०१७ मध्ये या वादाला वेगळं वळण लागलं. भारतात परतण्यासाठी निमिषाला तिचा पासपोर्ट हवा होता. तिने महदीला सेडेटिव्ट इंजेक्शन दिलं होतं. मात्र त्याच्या ओव्हरडोसमुळे महदीचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणात निमिषाला अटक करण्यात आली. आता तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १६ जुलैला तिला फाशी दिली जाणार आहे.