
आम्ही संघटना सांभाळण्यास खंबीर आहोत, संघटना ठेकेदारीवर चालवायची नाही-उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या बैठकीत सूर.
हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना संघटना सोडून ज्यांना जायचे आहे त्यांनी वाट न बघता सोडून जावे.आम्ही संघटना सांभाळण्यास खंबीर आहोत. संघटना ठेकेदारीवर चालवायची नाही, असा सूर चिपळूण येथे झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संघटनेच्या चिपळूण कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठकीत उमटला. अनेक पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेचा धक्का बसला आहे.
चिपळूण शहरातील एका हॉटेलच्या सभागृहात चिपळूण शहर परिसरातील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. काही दिवसांपूर्वी शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी सहसंपर्कप्रमुख सचिन कदम यांनीदेखील राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेची पडझड रोखण्यासाठी चिपळुणात खास बैठक आयोजित करण्यात आली.बैठकीला विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे यांसह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.