
महिला पतसंस्था जपतेय सामाजिक बांधिलकीडॉ. सोपान शिंदे; आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद.
रत्नागिरी : जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेने महिलांसाठी रक्तातील साखर आणि नेत्र तपासणीचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला आहे. मी प्रथमच पाहतोय की सामाजिक बांधिलकीच्या नात्याने कर्जदाराला मदत देतोय. ही महिलांची संस्था असल्यानेच हे शक्य झाले, असे प्रतिपादन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले.रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्था आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रत्नागिरी व लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते.
महिला पतसंस्थेच्या मारूती मंदिर- के. सी. जैननगर येथील प्रधान कार्यालयात शिबिराला प्रतिसाद मिळाला.या प्रसंगी पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ. युगंधरा राजेशिर्के, सहाय्यक निबंधक साहेबराव पाटील, संतोष पाटील, पायल आंबेकर, संचालिका स्वप्ना सावंत, लायन्स क्लबचे सचिव विशाल ढोकळे, प्राची शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी कृतिका सुवरे, व्यवस्थापिका आदिती पेजे आदी उपस्थित होते.या वेळी सौ. युगंधरा राजेशिर्के यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकामध्ये त्या म्हणाल्या की, शरद पवार यांच्या प्रयत्नाने खास बाब म्हणून जिल्हा कार्यक्षेत्र देऊन राज्यातील तीन पतसंस्थांना परवानगी दिली गेली. त्यापैकी रत्नागिरी जिल्हा महिला पतसंस्था ही एकच संस्था आजपर्यंत व्यवस्थितरित्या चालू आहे.
अनेकदा धावपळीच्या काळात महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर घरातील सर्व गोष्टी सुरळित होतात. महिला तपासणीसाठी जात नाहीत. त्यामुळे आज हे विशेष शिबिर आयोजित केले.याप्रसंगी गंभीर आजाराकरिता एका महिलेला संस्थेतर्फे मदतीचा धनादेश देण्यात आला. तसेच लायन्स क्लबतर्फे शिधा वाटप करण्यात आले. प्राची शिंदे यांनी लायन्स क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. नेत्र रुग्णालय, मोफत डायलिसिस, रेटिनावर उपचार करणारे नवे हॉस्पीटल याविषयी माहिती सांगितली.