
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत “रत्नदुर्ग डिजिटल मीडिया”च्या वेबसाईटचे उद्घाटन .
रत्नागिरी : रत्नागिरीतील पत्रकारितेत गेली १७ वर्ष कार्यरत असणाऱ्या कोमल कुळकर्णी-कळंबटे यांच्या “रत्नदुर्ग डिजिटल मीडिया” या न्यूज पोर्टलचे उद्घाटन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज (८ मार्च) अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार सुदेश शेट्ये आणि ज्येष्ठ महिला पत्रकार सौ. अनघा निकम-मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले.कोमल कुळकर्णी यांनी २००८ मध्ये दैनिक “सकाळ”मधून पत्रकारितेला सुरुवात केल्यानंतर त्यानंतरच्या कालावधीत वेगवेगळ्या वृत्तपत्रातून काम करतानाच पत्रकारितेचे बदलते स्वरूप अंगीकारत २०१७ मध्ये “बाईट्स ऑफ इंडिया” या पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. आता “रत्नदुर्ग डिजिटल मीडिया”च्या माध्यमातून स्वतःचे न्यूज पोर्टल सुरू केले आहे.

२० फेब्रुवारी रोजी प्राथमिक स्वरूपात व्हॉट्सॲपग्रुपच्या माध्यमातून “रत्नदुर्ग डिजिटल मीडिया”चे काम सुरू केले होते; मात्र आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी पोलीस दलाच्या कर्तबगार महिला पोलीस अधिकारी श्रीमती जयश्री गायकवाड, रत्नागिरीच्या पत्रकारितेत गेली ४० वर्षे कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार सुदेश शेट्ये आणि गेली २५ वर्षे रत्नागिरीच्या पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या महिला पत्रकार आणि उत्तम निवेदक सौ. अनघा निकम-मगदूम यांच्या हस्ते वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी रवींद्र कुळकर्णी, युवा छायाचित्रकार हर्षल कुळकर्णी, तन्मय दाते, दुर्गेश पिलणकर, सौ. सेजल कुळकर्णी उपस्थित होत्या