
शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का; एकाचवेळी चार बडे नेते सोडणार उद्धव ठाकरेंची साथ.
महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं. विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात तब्बल 232 जागा मिळाल्या, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ पन्नास जागांवरच समाधान मानावलं लागलं. दरम्यान त्यानंतर महाविकास आघाडीला गळती लागली आहे, महाविकास आघाडीमधील अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. भाजप आणि शिवसेनेत सध्या जोरदार पक्षप्रवेश सुरू आहेत. याचा सर्वात मोठा फटका बसला आहे, तो म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना आणि भाजपात प्रवेश केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर इतर पक्षात होणारे पक्षप्रवेश हे ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरत आहेत. आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे दोन बडे नेते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.माजी मंत्री उत्तम खंदारे, माजी आमदार शिवरन पाटील, दोन जिल्हाप्रमुख आणि एक सहसंपर्कप्रमुख आज ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश होणार आहे. उत्तम खंदारे आणि शिवरन पाटील यांच्यासोबतच बुलढाणा, वाशिम, सोलापूर या जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते संजय जाधव, भावना गवळी आणि आमशा पाडवी यांची देखील उपस्थिती असणार आहे.