
वाशी बाजारपेठेत दिवसभरात एकूण ९ हजार १४१ आंबा पेट्या विक्रीला.
हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे यावर्षी हापूसचे प्रमाण खूप कमी आहे. गतवर्षीच्या हंगामात या दिवसांत ३५ ते ४० हजार पेटी आंबा विक्रीला येत होता. यावर्षी आंबा उत्पादन अत्यल्प असल्यामुळे बाजारात पेट्या विक्रीला पाठवण्याचे प्रमाण कमी आहे. मंगळवारी वाशी बाजारपेठेत दिवसभरात एकूण ९ हजार १४१ आंबा पेट्या विक्रीला आल्या. त्यापैकी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ४,५६६ तर अन्य राज्यांतून ४,५७५ आंबा पेट्या आल्या होत्या.
दरवर्षी नैसर्गिक संकटामुळे आंबा उत्पादन धोक्यात येत आहे. यंदाही तीच स्थिती आहे. उत्पादनाची अशी स्थिती असताना यावर्षी प्रथमच ९ हजार पेट्या एकाच वेळी विक्रीला गेल्या आहेत. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गातून आंबा बाजारात पाठवण्यात येत असला तरी सर्वाधिक आंबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. सध्या पेटीला ३५०० ते ९००० रुपये दर मिळत आहे. गतवर्षी याच दिवसात ४० हजार पेट्या विक्रीला होत्या. शिवाय दर १५०० ते ४००० रुपये होता.