
धोकादायक इमारत पावसाळ्यापूर्वीच बंद दापोलीतील जि.प. पंचनदी शाळेबाबत शिक्षण विभागाचा खुलासा
रत्नागिरी, दि.21 ) : दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पंचनदी शाळेमध्ये नादुरुस्त इमारत पावसाळ्यापूर्वी बंद करुन ठेवण्यात आली आहे. या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसविले जात नाही, असा खुलासा दापोली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी केला आहे.
याबाबत दिलेल्या खुलाशामध्ये नमूद केले आहे, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पंचनदी या शाळेत पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असून विद्यार्थी पटसंख्या 44 आहे. या शाळेत कार्यरत शिक्षक संख्या 4 असून शाळेच्या तीन इमारतींमध्ये एकूण 6 वर्गखोल्या आहेत. शाळेच्या इमारत क्र. 1 मध्ये 2 मध्ये वर्गखोल्या असून या इमारतीचे छत पत्र्याचे आहे. इमारत व वर्गखोल्या सुस्थितीत आहेत. इमारत क्र. 2 स्लॅबची असून इमारतीचे छत षटकोनी आकाराच्या वर्गखोल्या दोन आहेत व उतरते छत असल्याकारणाने पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने स्लॅब मधून गळती झालेली आहे. यावर्षी गळतीचे प्रमाण निर्माण झालेले आहे. इमारत क्र. 3 ही स्लॅबची आयताकृती इमारत असून इमारतीवरील छत सपाट आहे. या इमारतीत दोन वर्गखोल्या असून विद्यार्थी बसविण्याची स्थिती नसल्याने ही इमारत पावसापूर्वीच बंद करुन ठेवलेली आहे व या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसविले जात नाही. ही इमारत धोकादायक वाटत असल्यामुळे सदर इमारतीचा वापर करण्यात येत नाही. पालकांचे म्हणणे आहे की, या सर्व इमारती दुरुस्त होणे गरजेचे आहे. इमारत क्र. 1 चांगल्या स्थितीत आहे. इमारत क्र. 2 या वर्गखोल्या पाझरणाऱ्या इमारतीवर पत्राशेड टाकणे गरजेचे आहे व त्या इमारतीची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. जेणेकरुन भविष्यातील विद्यार्थी बैठकीचा प्रश्न सुटेल.
इमारत क्र. 3 या इमारतीमधील 2 वर्गखोल्या धोकादायक असल्याने या इमारतीच्या स्लॅबची पडझड, भिंती, दरवाजे यांची पडझड झाली असून त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट सन 2023 मध्ये झालेले असून इमारत धोकादायक असल्याचा अहवाल बांधकाम विभागाने दिला आहे. सदर इमारत धोकादायक असल्याने दोन नवीन वर्गखोल्या मिळणे आवश्यक आहे. सध्या इमारत क्र. 1 व इमारत क्र. 2 मध्ये विद्यार्थी बसण्याची व्यवस्था आहे.