
संगमेश्वर येथून थेट पाटणला जोडण्यासाठीच्या घाटमार्गे रस्त्याच्या सर्वेक्षणाला सुरवात.
संगमेश्वर येथून थेट पाटणला जोडण्यासाठीच्या घाटमार्गे रस्त्याच्या सर्वेक्षणाला सुरवात झाली आहे. हा मार्ग अस्तित्वात झाला तर पाटणला जाणे सोपे होईल. त्यासाठी चिपळूणवरून पाटणला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच वेळेचीही बचत होईल आणि पर्यायी मार्ग तयार होणार आहे.तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गापासून सुरू होणाऱ्या संगमेश्वर पाटण घाटमार्ग सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांनी २८ फेब्रुवारीला संगमेश्वर तालुक्यातील नेरदवाडी या ठिकाणी भेट दिली.
सर्वेक्षण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. या पाहणीवेळी संगमेश्वर पाटण घाटमार्ग समन्वयक समितीचे समन्वयक संतोष येडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव जाधव, शाखा अभियंता अक्षय बोरसे, लक्ष्मीकांत खातू, गुरूप्रसाद भिंगार्डे, ओंकार लोध, नील खात, संतोष खातू, भागोजी शेळके, माजी सरपंच कोंडीबा शेळके, पांडुरंग येडगे, प्रकाश शेलार, कृष्णा कोळापटे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.संगमेश्वर ते पाटण या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम मोनार्क सर्व्हेअर अॅन्ड इंजिनिअरिंग कन्सल्टंट या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीचे तेजस माने यांनी घाटमार्ग रस्ता कामाची माहिती कार्यकारी अभियंता ओटवणेकर यांना दिली. यावेळी ओटवणेकर यांनी रस्त्याच्या पाटण तालुक्यातील लांबीबाबत सूचना केल्या आहेत.
या सर्वेक्षणाबाबत अचूक अहवाल तयार करून तो विहीत मुदतीत सादर करा, असेही सांगितले. संगमेश्वर ते चाफेर (पाटण) हा एकूण ४६.६०० किलोमीटरचा रस्ता आहे. त्यापैकी २६.६०० किमी एकेरी रस्ता असून फक्त २० किलोमीटरचा रस्ता तयार करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा हद्दीतील ५.५०० कि.मी., तर सातारा जिल्हा हद्दीतील १४.६०० कि.मी. अंतरामधील रस्ता शिल्लक आहे. या कामाला तातडीने मंजुरी मिळण्यासाठी शासनदरबारी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असल्याचे समन्वयक संतोष येडगे यांनी सांगितले.