
शिमगोत्सवासाठी चाकरमान्यांना खूषखबर ! एसटीच्या ३१ जादा गाड्या धावणार.
कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरू झाली आहे. या सणासाठी मुंबई, पुणे तसेच नोकरी, व्यवसायासाठी परजिल्ह्यात स्थिरावलेली मंडळी आवर्जून गावी येतात. यासाठी येथील राज्य परिवहन महामंडळ विभागातर्फे शिमगोत्सवासाठी येण्यासाठी व शिमगोत्सवानंतर परतण्यासाठी दैनंदिन जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.मुंबई-पुणे मार्गावर रत्नागिरी विभागातून दैनंदिन ११० गाड्या धावतात. त्यामध्ये ३१ जादा गाड्या धावणार आहेत. गरज पडल्यास अधिक गाड्यांची व्यवस्था केली जाणार आहे.
शुक्रवारी (ता. १४) धूळवड साजरी होणार आहे. १५ पासून पालखी घरोघरी येणार आहे. ग्रामदेवतेची पालखी घरोघरी येणार असल्यामुळे खास पालखीसाठी भाविक घरी येतात. शुक्रवारी होळीची सुट्टी असली आणि पुढील दोन दिवस सप्ताहाची अखेर अशा जोडून सुट्ट्या आल्याने गावाकडे येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. शिमगोत्सवासाठी गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई व उपनगरातून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
चिपळूण, खेड, दापोली व गुहागर आगारातून प्रत्येकी सहा तर मंडणगड आगारातून ५, रत्नागिरी-४ तर लांजा -राजापूर आगारातून प्रत्येकी दोन मिळून एकूण ३१ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. १२ मार्चपासून जादा गाड्या धावणार आहेत. १८ मार्चपर्यंत गाड्यांचे आरक्षण प्रवाशांकडून करण्यात आले आहे; मात्र, प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या उपलब्ध करून देणार असल्याचे रत्नागिरी विभागाकडून सांगण्यात आले.