
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी!
रायगड : अलिबाग येथील जे.एस.एम कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक आणि जनशिक्षण संस्था रायगडचे माजी अध्यक्ष अविनाश मनोहर ओक यांनी आत्महत्या केली आहे. पेण रेल्वे स्टेशन येथे धावत्या रेल्वे समोर उडी मारून त्यांनी जीवन संपवलं. अविनाश ओक यांच्या आत्महत्येमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे पेण उप जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाले. किरीट सोमय्या हे प्राध्यापक अविनाश ओक यांचे चुलत मेहुणे असल्याची माहिती आहे.
निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक हे पेण येथील एका आय डे केअर या संस्थेत भेट देण्यासाठी आले होते. यानंतर ते स्वतःच्या गाडीने निघून गेले. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांनी गाडी पेण रेल्वे स्टेशनच्या समोर उभी करून स्थानकात येणाऱ्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.या घटनेच वृत्त समजताच भाजपचे माजी खासदार किरीट सोमेय्या यांनी ताबडतोब पेण येथे धाव घेतली. यानंतर मृत अविनाश ओक यांचा मृतदेह अलिबाग येथील त्यांच्या राहत्या घरी पाठवण्यात आला.
पोलिसांना प्राध्यापक अविनाश ओक यांच्या आत्महत्येची चिठ्ठी त्यांच्या शर्टाच्या खिशात सापडली आहे. या चिठ्ठीत ‘मी आत्महत्या करत आहे, मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये’ असा मजकूर लिहिला आहे.
अविनाश ओक हे मूळचे रायगड मधील माणगाव येथे राहणारे असून त्यांचे वडील प्रसिद्ध वकील होते. प्राध्यापक अविनाश ओक अलिबाग येथे कामानिमित्ताने स्थायिक झाले होते. अलिबाग येथील जे.एस.एम कॉलेज येथे राज्यशास्त्र या विषयाचे ते प्राध्यापक होते. याच दरम्यान त्यांनी रायगडच्या जनशिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद भूषविले होते. त्यांच्या पत्नी अलिबाग येथील कमळ नागरी संस्थेच्या संचालिक आहेत. प्राध्यापक अविनाश ओक यांचा सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात मोठे कार्य होतं.