
वारंवार मागणी करूनही कुंभार्ली घाटातील सुरक्षा ऐरणीवर, नागरिक विचारणार जाब.
करोडो रुपये खर्च करूनही चिपळूण-कराड राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाट वाहतुकीसाठी आजही असुरक्षितच पहायला मिळत आहे. या ठिकाणी खड्ड्यातून सातत्याने अपघात घडत असून त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. तर कित्येकजण जायबंदी होवू लागले आहेत. याचाच जाब विचारण्यासाठी चिपळुणातील राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक सार्वजनिक बांधकाम विभागावर धडक देणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे यांनी दिली.काही दिवसांपूर्वी कुंभार्ली घाटात सुमारे चारशे फूट दरीत कार कोसळून मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
दोन दिवसांनी हा अपघात उजेडात आला. यानंतर कुंभार्ली घाटातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यासंदर्भात भरत लब्धे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देत मंगळवारी चर्चेसाठी येणार असल्याचे कळविले आहे. गेल्या अनेक वर्षापासून दरवर्षी चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाटात सुरक्षेसाठी कराडो रुपये खर्च केले जात आहेत. त्याचा कोणताही उपयोग न होता या घाटात वारंवार अपघात होत आहेत. यामध्ये अनेकजण दगावले आहेत. तर संबंधितांची मोठी आर्थिक हानी झाली आहे.www.konkantoday.com