“औरंगजेब क्रूर नव्हता” म्हणणाऱ्या अबू आझमींचं निलंबन, अधिवेशनातला मोठा निर्णय!

समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर आता त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. आज भाजपा व शिवसेना (शिंदे) आमदारांनी विधानसभेत या वक्तव्यावरून गोंधळ घातला. अबू आझमी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली.

या प्रकरणी आता अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी निलंबित आमदार असणार आहेत. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव भाजपा आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. त्यानंतर अबू आझमी यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं.

अध्यक्ष महोदय मी असा प्रस्ताव मांडतो की अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं त्याची भलामण करणारे आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. ही त्यांची वक्तव्यं आक्षेपार्ह आहेत. त्यांची वक्तव्यं निषेधार्ह आहेत. यामुळे सभागृहाचा अपमान झाला आहे. अबू आझमींनी विधानसभेची प्रतिमा मलीन केली. त्यामुळे ही विधानसभा असा ठराव करते आहे की अबू आझमी यांचं सदस्यत्व अर्थसंकल्प अधिवेशनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत निलंबन करावे.

चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडल्यानंतर सुधीर मुनगंटीवार उभे राहिले. ते म्हणाले, अध्यक्ष महोदय, अबू आझमींचं निलंबन हे फक्त हे अधिवेशन संपेपर्यंतच का? छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण देव किंवा देवापेक्षा जास्त मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अबू आझमींनी केला आहे. औरंगजेब हा लुच्चा आणि लफंगा होता. औरंगजेबाच्या बापानेही काय म्हटलं आहे? शहाजहाँने सांगितलं होतं की उन्हाळा वाढला आहे माझं प्यायचं पाणी वाढवा, तेव्हा लुच्चा लफंगा औरंग्या काय म्हणतो? जिंदा रहना है तो रहो नही तो मर जाओ. जो स्वतःच्या बापाला असं म्हणतो आहे त्याच्याबाबत अबू आझमी असं कसं काय बोलतो? त्याची भलामण अबू आझमी कशी काय करतात? मी चंद्रकांत पाटील यांना सांगू इच्छितो की प्रस्तावात बदल करा.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अपमान यासाठी कुठलंही आयुध लागणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान झाल्यास कुठल्याही आयुधाची मर्यादा बाळगू नये असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे. १ लाख कवट्यांचा महाल बांधणारा तैमूरलंग नाही. तसंच छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा औरंग्या आणि त्याची भलामण करणारे अबू आझमी यांचं निलंबन दीर्घ काळासाठी करावं अशीही मागणी मुनगंटीवार यांनी केली. प्रस्ताव सभागृहात सादर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यासाठी आमदारांचा कौल घेतला. त्यानंतर अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

“चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरp बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button