
देवरूखात डॉ. नाईकवाडे, मोरे यांनी इपिजिनिया देवरूखेन्सिस या प्रजातीचा शोध लावला.
आठल्ये-सप्रे पित्रे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रताप नाईकवाडे आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतिक मोरे यांनी इपिजिनिया देवरूखेन्सिस या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. ही वनस्पती आता इपिजिनिया देवरूखेन्सिस मोरे नाईकवाडे अशा नावाने आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखली जाणार आहे.ही प्रजात देवरूखमधील साडवली व आंबवलीच्या सड्यावर पावसाळी हंगामात नैसर्गिक पद्धतीने फुलते. जून ते सप्टेंबर या काळात ती या दोन सड्यांवर दिसते. या वनस्पतींवर गुलाबी रंगाची सुंदर नाजूक फुले फुलतात.
कॉलचीकेसी या वनस्पतीच्या गटातील इपिजिनिया या कुळात भारतात ७ प्रजाती आढळतात. त्यामधील पाच प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात. यात आता एका नव्या प्रजानीची भर पडली आहे. यापूर्वी इपिजिनिया रत्नागिरीका ही प्रजात रत्नागिरी जिल्ह्यात आढळते. तिची संख्या कमी असल्याने तिला आययुसीएन या आंतरराष्ट्रीय संस्थेने संकटग्रस्त प्रजात म्हणून घोषित केले आहे. तिचा आणि कोकण दीपकाडी यांचा अभ्यास करत असताना डॉ. नाईकवाडे व प्रतिक मारे यांना जाणवले की, रत्नागिरीतील वनस्पती प्रजातीपेक्षा देवरूख परिसरात आढळणारी वनस्पती वेगळी आहे. २ वर्ष अभ्यास केल्यावर त्यांनी ही प्रजाती नवीन आहे असा निष्कर्ष काढला. न्यूझीलंड येथून प्रकाशित होणार्या फायटोटॅक्सा या प्रतिष्ठीत संशोधन नियतकालिकामधून त्यांचे संशोधन नुकतेच प्रकाशित झाले. या प्रजातीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. देवरूख परिसरातून ही पहिलीच प्रजात या अभ्यासकांनी शोधून काढल्याने परिसर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.www.konkantoday.com