टीम इंडियाची थेट फायनलमध्ये धडक; सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पाजलं पाणी!


रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम गाजवला. दुबईतल्या उपांत्य सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सनी पराभव केला. भारताच्या या विजयात फलंदाज आणि गोलंदाजांनीही आपला ठसा उमटवला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी व्या षटकांतच विजयासाठीचं 265 धावांचं लक्ष्य गाठले. भारताकडून विजयी लक्ष्याच्या पाठलागात विराट कोहलीनं मोलाची भूमिका बजावली. त्यानं श्रेयस अय्यरच्या साथीनं 91 धावांची, अक्षर पटेलच्या साथीनं 44 धावांची आणि लोकेश राहुलच्या साथीनं 47 धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या दिशेनं नेलं. विराट कोहलीने 84, श्रेयस अय्यरने 45, अक्षरने 27 धावांची आणि राहुलने 42 नाबाद धावांची खेळी उभारली.
तत्पूर्वी, दुबईच्या मैदानात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला शमीसह भारतीय फिरकीने काही प्रमाणात जखडून ठेवले. सलामीवीर ट्रेव्हिस हेडच्या 33 चेंडूंमधील आक्रमक 39 धावांनंतर कांगारुंना भारताने वेसण घातली होती. मग स्टीव्ह स्मिथ 96 चेंडूंमध्ये 73 संयमी तर अॅलेक्स कॅरीने 57 चेंडूंमध्ये 61 धावांची आक्रमक खेळी करत संघाला अडीचशे पार पोहोचवलं. भारताकडून शमीने तीन तर वरुण चक्रवर्ती आणि डावखुरा स्पिनर रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव 49.3 षटकांत 264 वर आटोपला.
अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम
विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यासह, भारताने 2023च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला. भारतीय संघ स्पर्धेत अपराजित राहिला आणि अंतिम फेरीत पोहोचला. मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला स्थान मिळवण्यात यश मिळण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. भारताने यापूर्वी 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप, 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यातही स्थान मिळवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button