
पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि त्रासदायक कॉल करणाऱ्या तरुणाला महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी केली अटक.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि त्रासदायक कॉल करणाऱ्या तरुणाला महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अमोल काळे (वय २५) असे आरोपीचे नाव असून, तो पुण्यात राहत असून मूळचा बीड जिल्ह्यातील आहे.या प्रकारामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात सोशल मीडिया समन्वयक म्हणून कार्यरत असलेल्या निखिल भामरे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७८ आणि ७९ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये एफआयआर नोंदवला.आरोपी अमोल काळे याने ज्या मोबाइल नंबरवरून पंकजा मुंडे यांना कॉल आणि मेसेज पाठवले, त्या नंबरच्या आधारे पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. लोकेशन ट्रेस केल्यानंतर तो पुण्यातील भोसरी भागात असल्याचे समोर आले.
तातडीने कारवाई करत सायबर पोलिसांनी भोसरी पोलिस स्टेशनच्या मदतीने त्याला अटक केली.चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यानंतर त्याला बीएनएस कायद्यानुसार नोटीस देण्यात आली आणि अधिक तपासासाठी मुंबईत आणण्यात आले. औपचारिकरित्या त्याला अटक करण्यात आली आहे.आरोपी अमोल काळे हा विद्यार्थी असून त्याने अश्लील भाषा का वापरली आणि त्यामागील हेतू काय होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अशा प्रकारची गंभीर सायबर गुन्हेगारी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकते, त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.