
चिपळुणात गरीब विक्रेत्यांवर ऐन सणासुदीत अन्याय-माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे.
गेल्या 20 वर्षात नगर परिषद प्रशासनाला नव्याने उभारलेली भाजी मंडई आणि मटण मार्केट शहरातील छोटे मोठे विक्रेते व व्यापार्यांकरिता खुली करता आलेली नाही. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे स्थानिक विक्रेता ग्राहकांना अक्षरशः नगर परिषदेच्या सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे.मात्र, आता प्रशासन आपल्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी छोटे विक्रेते आणि फेरीवाल्यांवर ऐन रमजान व शिमगोत्सवाच्या तोंडावर अतिक्रमणच्या नावाखाली कारवाई करून अन्याय करीत असल्याचा गंभीर आरोप माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.सलग दोन दिवस शहरात नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे.
बाजारपेठेतील पानगल्ली, नाईक कंपनी पूल, भाजी मंडई, चिंचनाका, भोगाळे, पॉवरहाऊस, उपनगर परिसरातील हातगाडीधारक, खोकेधारक व फेरीवाल्यांवर कारवाई केली. एवढेच नव्हे तर आता रस्त्यालगत व्यवसाय करणार्या विक्रेत्यांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाने बजावले आहे. मात्र, काही व्यावसायिकांना वगळून कारवाईत दुजाभाव केला जात असल्याची ओरड सुरु आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक विक्रेत्यांमधून तीव्र भावना व्यक्त केल्या जात असून माजी उपनगराध्यक्ष शिंदे यांनीही प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेतला आहे.