
कोकण रेल्वे मार्गावर उधना-मंगळूरच्या जादा फेऱ्या पश्चिम रेल्वेचे नियोजन ; शिमगोत्सवासाठी येणाऱ्यांना दिलासा
शिमगोत्सवासह उन्हाळी सुट्टी हंगामात नियमित गाड्यांना प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने उधना मंगळूर द्विसाप्ताहिक स्पेशलच्या ७० फेऱ्या जाहीर केल्या आहेत.ही साप्ताहिक स्पेशल २ मार्चपासून २९ जूनपर्यंत वसईमार्गे धावणार आहे.शिमगोत्सवाची धामधूम १३ मार्चपासून सुरू होणार आहे.शिमगोत्सव संपल्यानंतर उन्हाळी सुट्टीचा हंगामही सुरू होत आहे. शिमगोत्सवासाठी चाकरमानी मोठ्याप्रमाणात गावी येतात. गावाहून मुंबईला कुटुंबियांसमवेत जाणाऱ्या लहान मुलांचीही संख्या अधिक असते. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाने उधना मंगळूर स्पेशलच्या ७० फेऱ्या जाहीर केल्यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
उधना मंगळूर द्विसाप्ताहिक विशेष गाडी दर बुधवारी व रविवारी धावेल. ही गाडी उधना येथून रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.४५ वाजता मंगळूर येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात ३ मार्च ते ३० जून या कालावधीत दर गुरूवारी व सोमवारी धावेल. मंगळूर येथून रात्री १० वाजून १० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी उधना येथे पोहचेल. या गाडीमुळे चाकरमान्यांचा प्रवास चांगला होणार आहे.