
कर्नाटकात महाराष्ट्र राज्याच्या बस चालक, वाहकाच्या तोंडाला कलबुर्गी शहरात काळे फासले
कर्नाटकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या तोंडाला काळे फासल्याच्या प्रकार कांही केल्या कमी होत नाही. शनिवारी (ता. एक) कलबुर्गी शहरातील रिंग रोडला कर्नाटका रचना वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बस थांबवुन चालक, वाहकाला काळे फासले.शिवाय बस वर काळ्या, पिवळ्या व लाल रंगाने, कन्नड भाषेत ‘जय कर्नाटका’ लिहित निषेध व्यक्त केला.
उमरगा तालुका हा एक सीमावर्ती भागात असल्याने, येथे मराठवाड्यातुन नांदेड, छत्रपती नगर, भोकर, जालना, निलंगा, लातूर आगाराच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जातात. कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या महाराष्ट्रात असतात. मात्र गेल्या आठ, दहा वर्षापासुन बस चालकांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रकार सुरु आहे.मध्यंतरी कर्नाटक राज्याच्या आळंद – पुणे बसच्या चालकाला स्वारगेट येथे काळे फासण्याचा प्रकार झाला होता. तेवढ्या एका प्रकाराने कर्नाटकातील या संघटनेने महाराष्ट्र राज्याच्या बसेस अडवून घोषणाबाजी करण्याचा प्रकार सुरूच आहे. यामागे महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद की, भाषा वाद आहे, याचा उलगड बसचालकांनाही होत नाही.
दरम्यान शनिवारी (ता. एक) सायंकाळी पावणे पाच वाजता नांदेड आगाराची बस (क्र एम एच २० बी एल २२२४) कलबुर्गी बस स्थानकातून निघाल्यानंतर रिंग रोडला एका संघटनेच्या २५ ते ३० कार्यकर्त्यांनी बस अडविली. जय कर्नाटकाच्या घोषणा करत चालक नामदेव रामराव पपुले व वाहक संदिप ग्यानोबा किरवले यांना काळे फासले.
बसवर झेंडे लावले. बसच्या नंबर प्लेटवर काळे डांबर लावले, शिवाय कन्नड भाषेत ‘जय कर्नाटका’ लिहित निषेध व्यक्त केला