
कणकवलीत देहविक्री करणाऱ्या महिलांना पकडले, ते लॉज राणे यांच्या कार्यकर्त्याचे- माजी खासदार विनायक राऊत यांचा आरोप
कोकणात सध्या शिवसेना ठाकरे विरुद्ध राणे असा जोरदार सामना रंगला आहे. ठाकरे गटाच्या एकाही सरपंचाला निधी देणार नाही असे जाहीर वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केले होते. याचा चांगलाच समाचार माजी खासदार विनायक राऊत यांनी घेतला आहे. त्यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका करताना, येणाऱ्या काळात राज्यपालच त्यांना बडतर्फ करतील असे भाकीत ही केले आहे.
कणकवलीत काही दिवसांपूर्वी देहविक्री करणाऱ्या काही महिलांना अटक करण्यात आली. या महिला बांगलादेशी होत्या. परदेशातून त्या कणकवलीत देहविक्रीसाठी आल्या होत्या. त्यांना एका लॉजमध्ये पकडण्यात आले. त्यांना ज्या लॉजमधून पकडले तो लॉज कुणाचा होता? तो लॉज नितेश राणे यांच्या कार्यकर्त्याचा होता की नाही हे त्यांनी स्पष्ट करावे असे आव्हान देत एकच खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांवर या प्रकरणात दबाव टाकण्यात आला. त्यानंतर या महिलांना कणकवली रेल्वे स्थानकातून पकडण्यात आल्याचं दाखवण्यात आलं असा आरोप ही त्यांनी यावेळी केला.
नितेश राणे हे स्वत:ला हिंदुंचे मसिहा असल्याचे दाखवत आहे. मग त्यांचाच मतदार संघ असलेल्या मालवण मध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा कुणी दिल्या? घोषणा देणारे ते कोण होते? शिवाय त्यांना भंगारच्या व्यवसाय करायला देण्यासाठी कुणाच्या सरपंचाने परवानगी दिली होती? तो सरपंच भाजपचा आहे असा थेट हल्लाबोलच राऊत यांनी केला. त्यामुळे हे खोट असेल तर बापाची शपथ घेवून सांगा, हे खोटं आहे असं आव्हानही त्यांनी या निमित्ताने दिले.
विनायक राऊत यांनी यावेळी नितेश राणे यांचा चांगलाच समाचार घेतला. ठाकरे गटाच्या ग्रामपंचायतींना निधी देणार नाही असं नितेश राणे म्हणतात. यावर हा टिल्ल्या असा त्यांनी नितेश राणे यांचा उल्लेख केला. शिवाय निधी काय तुझ्या बापजाद्याचा आहे का? असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने केला. शिवाय याबाबत आपण राणेंना कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. असं ही त्यांनी सांगितलं. या नोटीसनंतर राज्यपालच या नितेश राणेंना बडतर्फ करतील असं ही राऊत यावेळी म्हणाले. राणेंनी जन्माची अद्दल शिवसैनिक घडवेल असंही ते यावेळी म्हणाले.