
आपला कोकण हा जगात सर्वोत्तम आहे, हे जगानेही मान्य करायला हवे. इतके सुंदर काम करा, – सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे.
कोकण सन्मान’ हा ‘कॉन्टेन्ट क्रिएटर्स’च्या हक्काचे व्यासपीठ आहे. तुम्हाला अजून प्रोत्साहन देण्यासाठी हे व्यासपीठ दिवसेंदिवस मोठं होत राहील. त्यामुळे कॉन्टेन्ट क्रिएटर्सने कोकणची संस्कृती, भाषा, खाद्य संस्कृती आणि कोकणचे अलौकिक सौंदर्य हे कोकणबाहेरीला जगाला दाखवत राहा.आपला कोकण हा जगात सर्वोत्तम आहे, हे जगानेही मान्य करायला हवे. इतके सुंदर काम करा, असे मत मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे व्यक्त केले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतील कोकणातील डिजिटल निर्मात्यांना सन्मानित करणारा प्रतिष्ठेचा ‘कोकण सन्मान-2025’ हा पुरस्कार सोहळा शुक्रवारी देवगड येथे हॉटेल वेदा हॉलिडेज् येथे पार पडला. विविध श्रेणींतील उत्कृष्ट ब्लॉगर, छायाचित्रकार, रिल निर्माते, खाद्य संस्कृतीप्रेमी आणि उद्योजकांना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. कोकण सन्मान सोहळ्याचे हे दुसरे वर्ष होते. कोकण सन्मान सोहळ्याचे उद्घाटन उद्योजक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा मिताली सावंत, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, भाजपचे देवगड प्रभारी संतोष किंजवडेकर, युवामोर्चाचे देवगड- जामसंडे शहरप्रमुख दयानंद पाटील, नरेश डामरी, वैभव बिडये, अंकिता प्रभू-वालावलकर, मनमित पेम, शंतनू रांगणेकर, ऋत्विक धुरी आणि गौरी पवार आदी उपस्थित होते.मंत्री नितेश राणे म्हणाले.
गोव्यामध्ये पर्यटन क्षेत्रात जरी मंदी असली तरी हीच वेळ कोकणाला जास्तीत जास्त प्रमोट करण्याची आहे. पर्यटनाच्यादृष्टीनेही कोकणासाठी हा महत्वाचा काळ आहे. क्रिएटर्सनी दर्जेदार कंटेंटच्या माध्यमातून कोकणचा गोडवा जगभर पोहोचवावा. ‘कोकण सन्मान’चा कणकवलीतून सुरू झालेला प्रवास आता देवगडपर्यंत आला आहे. हा प्रवास हळूहळू सिंधुदुर्गच्या इतर तालुक्यांमध्येही होईल. भविष्यात मुंबई, दुबईपर्यंतही आपण पोहोचू, एवढा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठी स्वप्ने पाहा. ती पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे त्यांनी सांगितले.