
रायगड किल्ल्यावरील रोपवे ०३ मार्च ते ०७ मार्च पर्यंत बंद
रायगड किल्ल्यावरील रोपवे ०३ मार्च ते ०७ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. राज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर जाणाऱ्या वयोवृद्ध व शाळकरी मुलांसाठी सोयीस्कर असणारा हिरकणी वाडी येथील रायगड किल्ल्यावरील रोपवे हा तांत्रिक देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.अशी माहिती रायगड रोपवे चे साईट इन्चार्ज राजेंद्र खातू यांनी काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात स्पष्ट केले आहे.
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणी वाडी येथे रायगड रोपवे कार्यरत आहे. या रोपवेच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांसहित राज्याचे व केंद्राचे मंत्री व लाखो शिवभक्त किल्ल्यावर ये जा करीत असतात. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणारा किल्ले रायगड पाहण्यासाठी देश विदेशातून तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून व शाळा महाविद्यालयातून दरदिवशी हजारो पर्यटक किल्ले रायगडावर येत असतात.
सर्वच पर्यटकांना रायगडावर पायऱ्यांद्वारे जाणे अनेकांना शक्य होत नसल्याने हिरकणी वाडी येथे असणाऱ्या रायगड रोपवेने अनेक जण किल्ला पाहण्यासाठी जात असतात. या रोपवेच्या सोईमुळे वयोवृद्ध, लहान मुलं, दिव्यांगांना रायगडावर जाणे सहज शक्य झाले आहे. शिवाय या रोपवे मार्गामुळे वेळेची देखील बचत होते. अशा सर्व बाजूंनी उपयोगी पडणारा रोपवे तांत्रिक कामांसाठी बंद असणार आहे.