
जिल्हास्तरीय लोकशाही दिन…
प्रलंबित तक्रारी लवकरात लवकर निकाली काढा – राहुल गायकवाड
रत्नागिरी, दि. 3 : शासनाच्या 100 दिवस नियोजन आराखडा अंतर्गत लोकशाही दिनातील दाखल तक्रारी अर्ज लवकरात लवकर निकाली काढावेत, असे निर्देश उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आदींसह विविध विभागप्रमुख उपस्थित होते. क्षेत्रीय विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांनी दाखल अर्जानुसार तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले व संबंधित विभागप्रमुखांना आठवडाभरात तक्रारी अर्ज निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले, आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींबाबत संबंधित विभागाने आढावा घ्यावा. या सर्व दाखल तक्रारी लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत कार्यवाही करावी.



