
अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक संवेदनशीलपणे आपण बोलले पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तरुण मंत्री योगेश कदम यांना सल्ला
स्वारगेट बलात्कार घटनेवर बोलताना राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पीडितेकडून कोणताही विरोध झाला नसल्याचे म्हटले. त्यांच्या या विधानाने वादाला तोंड फुटले आहे.या विधानाबद्दल भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांना सल्ला दिला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील स्वारगेट येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेबद्दल माहिती दिली.’मंत्री संजय सावकारे असे म्हणतात की, ही घटना पुण्यातच नाही, तर देशभरात अशा घटना घडतात. योगेश कदम म्हणाले की, तरुणीने प्रतिकार केला नाही म्हणून घटना घडली’, असा मुद्दा माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला असं वाटतं की, योगेश कदम जे बोलले, त्याला वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं. योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते, त्यात माझा स्वतःचा हा समज आहे की, ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की, हा गर्दी असणार भाग आहे. लोक होते. बस काही आतमध्ये नव्हती, बाहेरच होती. पण, प्रतिकार होताना लोकांना लक्षात आला नाही. असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता.””ते नवीन आहेत. तरुण मंत्री आहेत. काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की, अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक संवेदनशीलपणे आपण बोलले पाहिजे.
कारण बोलताना काही चूक झाली, तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. निश्चितपणे जे मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील. अशा प्रकारच्या घटनांबद्दल बोलताना त्यांनी संवेदनशीलपणे बोललं पाहिजे, असा माझा सल्ला असेल”, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.