साहित्यात राजकीय स्थित्यंतराचे प्रतिबिंब उमटणारच – धीरज वाटेकर

चिपळूण :: राजकीय घडामोडींचा परिणाम समाजावर होऊन साहित्य निर्माण होत असते. सध्याचे राजकारण बिकट आणि मूल्यविहीन झाले आहे. त्यास वाचा फोडण्याची गरज आहे. देशातील एकूण परिस्थितीवर साहित्यिकांनी आपली भूमिका मांडली पाहिजे. लेखक मांडू पाहाणारे वास्तव समाजाला पचणार आहे का? साहित्यात पडलेले प्रतिबिंब सहन करण्याची मानसिकता आजच्या समाजामध्ये राहिली आहे का?समाज तेवढा सहिष्णू आहे का? असे प्रश्न उपस्थित करत राजकीय स्थित्यंतराचे मराठी साहित्यात प्रतिबिंब उमटणारच असल्याची भूमिका पत्रकार-लेखक धीरज वाटेकर यांनी मांडली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात “राजकारणाचे मराठी साहित्यावर उमटणारे प्रतिबिंब” या विषयावरील परिसंवादात वाटेकर यांनी आपली भूमिका मांडली.वाटेकर पुढे म्हणाले, राजसत्ता स्वकीय असेल वा परकीय, राजकारण स्वमताचे असेल वा भिन्न मताचे. काहीही असले तरी राजकीय व्यक्तिमत्त्वे ही समाजाचे अभिन्न अंग असतील तर समाजमनात राजकारणाचे प्रतिध्वनी उमटणे ही अपरिहार्य गोष्ट आहे. मराठी साहित्याच्या उगमाकडे जाताना महानुभाव साहित्य, ‘गाथा सप्तशती’, संत तुकारामांचे पाईकीचे अभंग, समर्थ रामदासांची पत्रे दासबोध आदित तत्कालीन राजकारणाचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. गोडसे भटजी वरसईकरांच्या ‘माझा प्रवास’ या प्रवासवर्णनात संस्थानिकीय राजकारण आणि ब्रिटीश राजसत्ता याचे दर्शन घडते.

मराठी मधील म्हणी, वाक्प्रचार, जात्यावरच्या ओव्या, अभंग, लोककलावंतांची गाणी, लोककलांतील संवाद यातूनही राजकीय प्रतिबिंब पडलेले दिसते. महाराष्ट्रात टोपणनावाने मार्मिक लिहिण्याची परंपरा आहे. बघ्याची भूमिका, कलंदर, ठणठणपाळ, सख्या हरी, ब्रिटिश नंदी, तंबी दुराई आणि १९४० मध्ये गाजलेले ‘आलमगीर’ ही टोपणनावे सदाबहार ठरलीत. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कोणत्याही स्वरूपातील दंभाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी ही सदरे आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या व घडणाऱ्या घडामोडींवर खुसखूशीतपणे टिप्पणी करणारी राहिली आहेत. ही लेखने वाचणाऱ्याला भावत आली आहेत, वाचकाला स्वतःची प्रतिक्रिया वाटत आली आहेत. राजकारणाचे साहित्यात उमटलेले प्रतिबिंब यात दिसते.

१९३८साली अध्यक्षपदावरून बोलताना, सावरकरांनी ‘लेखण्या मोडा बंदुका घ्या’ असे आवाहन केले होते. ‘ज्या देशाचा इतिहास दुबळा त्याचं साहित्यही दुबळं होतं तेव्हा आधी देश बलशाली करा’ अशी त्यामागची भावना होती. तत्कालिन राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब आपणास आचार्य अत्र्यांच्या १९४२च्या नाशिकमधील भाषणात पाहावयास मिळते.

१९४६ साली माडखोलकर यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या एकभाषी प्रांताला गांधीजींची परवानगी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. कवी यशवंत (१९५०) यांनी गांधीहत्त्येनंतरच्या राष्ट्रीय विध्वंसाची दखल घेतली होती. ‘गदिमा’च्या ‘बामणाचा पत्रा’लाही काहीशी याची पार्श्वभूमी आहे. लोकहितवादींची शतपत्रे, महात्मा जोतीराव फुले यांचे ‘शेतकऱ्याचा आसूड‘, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची ‘निबंधमाला’, ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे यांचे ‘काळ’ नियतकालिक यातही आपल्याला राजकीय प्रतिबिंब भेटते. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे ‘कीचकवध’ हे राजकीयदृष्ट्या सर्वात गाजलेले आणि सत्ताधाऱ्यांनी बंद पाडलेले नाटक होय. गो. पु. देशपांडे यांनी संपूर्णपणे राजकीय वैचारिक नाटके सातत्याने लिहिली आणि त्यांची एक वेगळी स्वतंत्र वाट मराठी रंगभूमीवर निर्माण केली होती. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली!’ ही लावणी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अतिशय गाजली होती.

कोकणातील कवी अरुण इंगवले यांच्या ‘आबूट घेऱ्यातला सूर्य’मधील कविता याही राजकारण, जात, धर्मांधतेवर प्रखर टीका करणाऱ्या आहेत. ‘एकविसाव्या शतकावरील समर्थ भाष्य’ करणाऱ्या आहेत. प्रा. संतोष गोनबरे यांच्या ‘माकडहाड डॉट कॉम’मध्ये प्राणीसृष्टीचा वावर कालातीत संदर्भांसह उपहासगर्भ कथेच्या फॉर्ममध्ये आणलेला आहे. राजकीय प्रतिबिंब अंगाने मराठी कादंबरीकडे पाहात बरेच मागे गेलो तर द्वा. ना. रणदिवे यांच्या ‘शिक्षक’ (१८८३) या कादंबरीचा उल्लेख करावा लागतो. रत्नागिरी जिल्हा बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या मॅडम सभापती, गँगरिन, सूड या कादंबऱ्यात राजकीय प्रतिबिंब आहे. ‘आज राजकारणाची पातळी खालावली आहे. त्यामुळे अधिकाधिक विषय लेखकांना मिळू शकतात.’ असं डॉ. चोरगे यांनी नमूद केलं आहे, ते वास्तव आहे.

अर्थात मोजके साहित्य सोडले तर मराठी साहित्यात निखळ राजकीय प्रतिबिंब असणारे साहित्य फारसे आढळत नाही. राजकीय व्यंगचित्रांना वाहिलेले एका अर्थाने प्रतिबिंब उमटवणारे ‘मार्मिक’ सारखे राजकीय क्षेत्राला वाहिलेले नियतकालिक मराठीत आढळत नाही. कन्नड आणि बंगाली साहित्याच्या पार्श्वभूमीवर सद्याच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करण्यासाठी मराठी लेखक धजावत नाहीत हे वास्तव आहे. मराठीत राजकारणाचे प्रतिबिंब उमटलेल्या साहित्यकृतीतील लेखक व नायक हे अपवाद वगळता संपादक किंवा पत्रकार आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची विधानपरिषदेवर वर्षभर नियुक्ती व्हायला हवी आहे. एकमेकांची निंदा नालस्ती करण्यासाठी राजकीय पुढारी जी असभ्य मराठी भाषा जाहीर व्यासपीठावरून वापरतात ती बंद व्हायला हवी. आजकाल साहित्य संमेलनात राजकारणाचे प्रतिबिंब विविध राजकीय नेतृत्वाच्या निमित्ताने दिसते. ते स्वागतार्ह आहे. पण साहित्यात तितकेसे प्रतिबिंब दिसत नाही.

ज्येष्ठ संपादक लेखक जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या परिसंवादात डॉ. समीर जाधव, शैलेश पांडे, सुरेश भटेवरा आणि संजय आवटे या पत्रकारिता आणि संपादन क्षेत्रातील ज्येष्ठ सहभागी झाले होते. साहित्यातून मराठी राजकारणाचे प्रतिबिंब उमटत नाही. मराठी साहित्यिक वेगवेगळ्या विषयांवर लिहितात. राजकारण आज ज्या दिशेला चालले आहे त्याला एक नवे वळण देण्याचे काम मराठी साहित्यिक करतील का? असे प्रश्न या परिसंवादातून उपस्थित करण्यात आले. वाटेकर यांना या परिसंवादासाठी मराठी इतिहास व साहित्याचे व्यासंगी अभ्यासक प्रकाश देशपांडे, ज्येष्ठ कवी-समीक्षक अरुण इंगवले, ज्येष्ठ पत्रकार प्रा. राजेंद्रप्रसाद मसुरकर, कोकणातील लोककलांचे अभ्यासक प्रा. संतोष गोनबरे, वडिल साहित्यिक मच्छिन्द्रनाथ वाटेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button