
मुंबई गोवा महामार्गावरील बाव नदी येथील देवरुख कडे जाण्यासाठी लावण्यात आलेला दिशादर्शक फलक चुकीच्या दिशेला.
मुंबई-गोवा महामार्गावरील काही फलक वाहनचालकांची दिशाभूल करणारे ठरत आहे. हातखंबा येथून संगमेश्वर येथे जाताना बावनदी बसथांब्यानजीक असलेला हा फलक चुकीची दिशा दर्शवत आहे. बावनदी बसथांब्याच्या अलीकडे हा फलक बसवण्यात आला आहे. या फलकावरून देवरूखला जाणारी दिशा डावीकडे दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र पूल ओलांडल्यावर देवरूख येथे जाण्यासाठी उजवीकडे वळण घ्यावे लागते.
हा फलक परस्परविरुद्ध दिशा दर्शवत असल्यामुळे नव्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांना निश्चितस्थळी पोहचण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे वेळेचा अपव्यय होऊन इंधनाचेही नुकसान होत आहे. त्यामुळे वाहनचालक व पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत आहे. संबधित दिशादर्शक फलकावर प्रशासनाकडून योग्य ती दुरुस्ती करून वाहनचालकांचा संभ्रम दूर कारावा अशी मागणी होत आहे.




