
मुंबई, कोकणात फेब्रुवारीमध्येच उष्णतेची लाट.
गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, तसेच कोकण किनारपट्टीच्या परिसरात तापमानात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी सर्वाधिक तापमानाची नोंद रत्नागिरी, तसेच पालघरमध्ये झाली होती. यावेळी रत्नागिरीचे कमाल तापमान ३८.९ अंश सेल्सिअस, तर पालघरचे तापमान ४० अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले होते. त्यानंतर मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी सर्वाधिक तापमानाची नोंद सांताक्रूझ येथे झाली.फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात मुंबईतील तापमानात अचानक वाढ झाली.
सुरुवातीच्या टप्प्यातच इतके ऊन वाढल्याने नागरिक आश्चर्यचकित झाले. ही उष्णता नेहमीसारखी नव्हती. मुंबई दमट हवामानासाठी ओळखली जाते. पण गेल्या चार दिवसांत वातावरणात आर्द्रता नव्हती. उन्हाचे चटके बसत होते. शिवाय, असह्य अशा झळा सोसाव्या लागत होत्या. हे वातावरण मुंबईत नेहमीच आढळून येत नाही. साधारणपणे विदर्भ – मराठवाड्यात अशा प्रकारचे हवामान असते. मुंबईतील किमान तापमान मात्र सरासरीच होते. पण कमाल तापमान नेहमीपेक्षा ६ अंश सेल्सिअस अधिक नोंदवले गेले. पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मुंबईत ही स्थिती निर्माण झाल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला होता.