
मार्केट यार्डमध्ये राजरोसपणे कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील आंब्यांची देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री
फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यांचा हंगाम सुरू होताच गुलटेकडी मार्केट यार्डात रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्यांची विक्री सुरू झाली आहे.फळबाजारातील काही अडत्यांकडून रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात असताना बाजारात होत असलेल्या या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. फळांचा राजा म्हणून देशासह परदेशात रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याने नावलौकिक मिळविला आहे. नावलौकिकाबरोबर रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याला जीआय (भौगोलिक उपदर्शन) हे गुणवत्तेचे मानांकन मिळाले आहे.मार्केट यार्डमध्ये आंब्यांचा हंगाम बहरला असून, कोकणातील हापूससह परराज्यांतील विविध जातींच्या आंब्यांची आवक वाढली आहे. मात्र, अनेक आडते ग्राहकांची फसवणूक करीत परराज्यांतील आंब्यांची रत्नागिरी, देवगड हापूस आंब्यांच्या नावाने विक्री करीत आहेत. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी तत्कालीन पणन संचालकांनी परिपत्रक काढत अशा फसवणूक करणार्या आडत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश राज्यातील सर्व बाजार समित्यांना देऊन सुमारे चार वर्षे होत आली. मात्र, मार्केट यार्डमध्ये राजरोसपणे कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील आंब्यांची देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री केली जात आहे.www.konkantoday.com